Prashant Kishor। जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी मोठी घोषणा केली आहे. प्रश्न किशोर यांनी आगामी बिहार विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की त्यांनी हा निर्णय “जनहितासाठी” आणि “मोठ्या उद्देशाने” घेतला आहे. मात्र , ४८ वर्षीय माजी निवडणूक रणनीतीकारांनी त्यांच्या पक्षासाठी एक उदात्त ध्येय ठेवले आहे. त्यांनी सांगितले की, जन सुराज पक्षाने किमान १५० जागा जिंकल्या पाहिजेत, अन्यथा याच्याकडे पराभव म्हणून पाहिले जाईल असेही त्यांनी म्हटले आहे. प्रशांत किशोर यांनी आपल्या निर्णयाविषयी बोलताना, “मी बिहार विधानसभा निवडणूक लढवणार नाही. हा निर्णय राजकीय रणनीती म्हणून घेतलेला नाही, तर जनहित लक्षात घेऊन घेतला गेला आहे. आमचे ध्येय १५० जागा जिंकणे आहे; कमी जागा जिंकल्यास पराभव मानला जाईल.” असे त्यांनी सांगितले. Prashant Kishor। त्यांच्या घोषणेपूर्वी, जन सुराज पक्षाने आधीच त्यांच्या उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या होत्या. पहिल्या यादीत ५१ उमेदवार होते, तर दुसऱ्या यादीत ६६ उमेदवार होते. दोन्ही यादीत प्रशांत किशोर यांचे नाव नव्हते, ज्यामुळे ते स्वतः निवडणूक लढवतील की नाही याबद्दलच्या अटकळींना उधाण आले होते. आता, त्यांच्या विधानामुळे या अटकळींना पूर्णविराम मिळाला आहे. प्रशांत किशोर यांनी यापूर्वी निवडणूक रणनीतीकार म्हणून काम केले आहे. त्यांनी देशातील अनेक प्रमुख राजकीय पक्ष आणि नेत्यांसाठी निवडणूक रणनीती आखली आहे. आता ते बिहारमध्ये त्यांच्या पक्षाचा विस्तार करण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. गेल्या काही महिन्यांत, जन सूरज पक्षाने राज्यभर सार्वजनिक संवाद दौरे केले आहेत आणि संघटनात्मक विस्तारावर लक्ष केंद्रित केले आहे. Prashant Kishor।