पुणे जिल्हा | माळेगावचा प्रशांत भोसले क्लास टू अधिकारी

माळेगाव, (वार्ताहर)- कोणताही क्लास न लावता कठोर मेहनत, जिद्दी, सातत्यामुळे वनरक्षक असलेले प्रशांत अशोक भोसले या युवकाने शासनाच्या जलसंपदा विभागात सहायक अभियंता श्रेणी- २ (राजपत्रित पद) निवड झाल्याबद्दल सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
बारामती तालुक्यातील माळेगाव येथील मागासवर्गीय समाजातील प्रशांत अशोक भोसले या युवकाचे यश इतरांसाठी प्रेरणादायी आहे.
वडिल अल्पभूधारक शेतकरी, आई गृहिणी असलेल्या गरीब कुटुंबातील उपजत हुशार व तल्लख बुद्धीचा प्रशांत याने प्राथमिक शिक्षण ज्ञानदीप बालक मंदिर, दहावीपर्यंत एस. एस. एम. हायस्कूल, तर बारावी टिसी.
कॉलेज बारामती तर मॅकेनिकल इंजिनिअरिंग व एमबीएचे शिक्षण शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात घेतले.
शिक्षण घेताना परिवहन अधिकारी परिक्षेत थोडक्यात अपयश आल्याने निराश न होता प्रथम पहिल्या प्रयत्नात वनरक्षक होऊन पाटण (जि. सातारा) येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोयना अशा दुर्गम भागात सर्वोत्तम काम केले. याच काळात त्यांना अनेक पुरस्कार मिळाले.
दरम्यान वनरक्षक पदावर कार्यरत असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा देऊन जलसंपदा विभागाच्या (महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा २०२१) सहायक अभियंता श्रेणी -२ (राजपत्रित पद) गवसणी घातली आहे.
दरम्यान, प्रशांत भोसले यांनी आतापर्यंत नेटची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास झाले आहेत. नामवंत प्रा. डॉ. निलकंठ ढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करीत आहेत. दरम्यान, प्रशांत भोसले यांनी इस्रो, खेलो इंडिया, भाभा अनुसंधान, आरआरबी, जिई आदी परिक्षांचा अनुभव आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा, आई -वडील यांनी दिलेली साथ यामुळे यश मिळाले असून भविष्यात क्लासवन अधिकारी होण्यासाठी जोमाने कष्ट करणार आहे.





