पिंपरी | कासारसाई ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी प्रांजली शितोळे बिनविरोध

हिंजवडी, (वार्ताहर) – मुळशी व मावळच्या सीमेवर असलेल्या कासारसाई ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी प्रांजली सागर शितोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.उपसरपंच रेश्मा कुंभार यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या या पदासाठी निवडणूक घेण्यात आली.
कासारसाईच्या सरपंच प्रियंका गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसेविका आसमा नाईकवडे यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. यावेळी माजी सरपंच व विद्यमान सदस्य ललित शिंदे, गुलाब लेणे, स्वप्नील केमसे, हनुमंत कवितके, शारदा किरवे , नीता शितोळे, कविता शितोळे व स्वाती भिंताडे आदी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शितोळे समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी गर्दी केली होती. निवडीनंतर प्रांजली शितोळे म्हणाल्या, माझ्या माहेरकडूनच मला सामाजिक आणि राजकीय वारसा मिळाला आहे.
तसेच या गावाने सुद्धा मला ग्रामपंचायतच्या स्तरावर काम करण्याची संधी दिली. यामुळे मी ग्रामस्थांच्या ऋणात असून मतदारांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी जुन्या जाणत्या मंडळींचा सल्ला घेऊन पुढील काळात गावच्या विकासासाठी कार्यरत राहणार आहे.




