पुणे: पुण्याच्या खराडी भागातील कथित ड्रग्स रेव्ह पार्टी प्रकरणाने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली होती. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती डॉ. प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणात गंभीर आरोप झाल्यानंतर दोन महिन्यांच्या कोठडीत राहिलेल्या खेवलकर यांना पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला आहे. या निर्णयाने खडसे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून, राजकीय वातावरणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. जुलै महिन्यात पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रँचने खराडीतील एका स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये छापा टाकला होता. या छाप्यात खेवलकर यांच्यासह सात जणांना अटक करण्यात आली होती, ज्यात दोन महिला होत्या. पोलिसांनी कोकेन, मारिजुआना, हुकाह पॉट्स आणि मद्यसाठा जप्त केला होता. या प्रकरणात नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रोपिक सबस्टन्सेस (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. खेवलकर यांच्या मोबाईल फोन आणि लॅपटॉपवर अनेक महिलांचे अश्लील व्हिडिओ सापडल्याचा दावा करण्यात आला असून, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी याबाबत गंभीर आरोप केले होते. चाकणकर यांनी म्हटले होते की, हे एक मोठे रॅकेट असून, खेवलकर यांनी अनेक महिलांना फसवले आहे. या अटकेमुळे राजकारणात वादळी चर्चा सुरू झाल्या. एकनाथ खडसे यांनी पोलिसांवर राजकीय षड्यंत्राचा आरोप करत म्हटले होते की, “हे ट्रॅपमध्ये अडकविण्याचा प्रयत्न आहे. जर माझा जावई चुकीचा असेल, तर मी त्याचे समर्थन करणार नाही, पण सत्य समोर येईल.” खडसे यांनी पोलिसांच्या छाप्यातून काढलेल्या फोटोंना माध्यमांतून व्हायरल करण्याबाबतही आक्षेप घेतला होता. दुसरीकडे, शिवसेना (युबीटी) च्या नेत्यांनी याला सरकारविरोधी बोलणाऱ्यांना धक्का देण्याचा प्रयत्न म्हटले होते. पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसे या वकिल असल्याने कोर्टात ब्लॅक कोट घालून पतीचे समर्थन करण्यासाठी मैदानात उतरल्या. त्यांनी कोर्टात उपस्थित राहून जामिनासाठी प्रयत्न केले आणि म्हटले होते, “योग्य वेळी मी सर्व आरोपांवर उत्तरे देईन.” रोहिणी खडसे यांनी शरद पवार यांचीही पुण्यात भेट घेतली होती.सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर रोहिणी खडसे यांच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर केली होती. या प्रकरणात खेवलकर यांच्या फ्लॅटमध्ये यापूर्वीही अशा प्रकारच्या पार्टी झाल्याचे उघड झाले असून, पोलिसांनी तपास वाढवला होता. दोन महिन्यांच्या न्यायालयीन कोठडीत राहिल्यानंतर पुणे सत्र न्यायालयाने खेवलकर यांसह इतर आरोपींना जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने हे सांगितले की, तपास प्रक्रियेत कोणतीही अडचण येणार नाही, अशी अट घातली आहे. या निर्णयानंतर खेवलकर यांची लवकरच जेलमधून सुटका होण्याची शक्यता आहे. जामीन मिळाल्यानंतर रोहिणी खडसे यांच्याकडून प्रकरणावर काय भाष्य येईल, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.