Pranjal Khewalkar Case : खेवलकरच्या मोबाईलमधील पुरावे नष्ट; आणखी एक गुन्हा दाखल
पुणे – खराडी येथील आलिशान हॉटेलमध्ये झालेल्या ड्रग्ज पार्टीप्रकरणी अटक केलेल्या मुख्य आरोपी डॉक्टर प्रांजल मनिष खेवलकर (४१, रा. हडपसर) याच्या जामीन अर्जास पोलिसांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. एनडीपीएस कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता तसेच तपास अपूर्ण असल्याने जामीन मंजूर करू नये, अशी भूमिका पोलिसांनी न्यायालयात मांडली आहे.
पोलिसांनी सांगितले की, २७ जुलै रोजी खराडी येथील स्टेबर्ड अझुर सूट हॉटेलमध्ये पहाटे पोलिसांनी धाड टाकून तब्बल कोकेन, गांजा, १० मोबाईल फोन, दोन कार, हुक्कापॉट व दारूच्या बाटल्या असा मुद्देमाल जप्त केला होता. या कारवाईत खेवलकरसह निखिल पोपटाणी, समीर सय्यद, सचिन भोंबे, श्रीपाद यादव, ईशा देवज्योत सिंग आणि प्राची शर्मा यांना अटक करण्यात आली आहे.
…..असा झाला प्रयत्न
छापा टाकल्यावर पोलिसांनी डॉ.खेवलकर याचे दोन मोबाईल जप्त केले होते. त्याची न्याय वैद्यकीय तपासणी केली. यातील एक फोन सोनार नावाच्या व्यक्तीच्या नावावर होता. दरम्यान हा मोबाईल पुन्हा तपासला असता, त्यामधील व्हॉटस अप डाटा डिलीट झाल्याचे लक्षात आले. पोलिसांनी तपास केला असता.
डॉ. खेवलकर याच्या घरातील व्यक्तीने सीम कार्ड ज्याच्यानावावर होते, त्या व्यक्तीशी संपर्क साधल्याचे आढळले. त्याला हाताशी धरुन सीमकार्ड हरवल्याची तक्रार देऊन नवीन सीमकार्ड मोबाईल कंपनीकडून घेण्यास सांगण्यात आले. हे नवीन सीमकार्ड एका नव्या मोबाईलमध्ये टाकून चालू करण्यात आले.
यानंतर त्याव्दारे व्हॉटस अप डाटा/चॅट डिलीट करण्यात आला. मात्र पोलिसांनी अगोदरच सर्व डाटा स्वत:कडे घेऊन ठेवला होता. दरम्यान हा प्रकार डॉ.खेवलकर याची पत्नी रोहीनी खडसे यांनी केला असल्याचे काही वृत्त वाहिण्यांनी दावा केला आहे. यामुळे रोहीणी खडसे अडचणीत येण्याची शक्यता आहे.





