सोलापूर : हे सरकार लोकप्रतिनिधींचा आवाज दाबत आहे. आमचा मानसिक छळ करत आहे, असा खळबळजनक आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी सोमवारी येथे केला. न्यायालयीन आदेशामुळे पोलिस ठाण्यात हजेरी लावल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
शिंदे म्हणाल्या, देशभर सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर दबाव आणला जात आहे. आमचा मानसिक छळ केला जात आहे. मात्र, कितीही गुन्हे नोंदवले तरी आम्ही गोरगरीबांसाठी लढत राहणार आहोत. या मानसिक त्रासाविरोधात कायदेशीर लढा देत राहू.
जानेवारी 2018मध्ये सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलच्या दरवाढ प्रकरणात पालकमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला होता. त्यावेळी बंदोबस्तावरील पोलिसांशी हुज्जत घालत त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप होता. त्याबाबत शिंदे यांसह नऊ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यात त्या न्यायालयात हजर न राहिल्याने त्यांच्यावर अटक वॉरंट काढले. त्यात जामीन घेतल्यानंतर पोलिस ठाण्यात तीन दिवस हजेरी लावण्याचे आदेश दिले. सोमवारी हजेरी लावल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.