मोदींच्या उपस्थितीत ‘या’ दिवशी होणार प्राणप्रतिष्ठेची रंगीत तालिम ! CM योगींच्या प्रशासनाला सूचना

नवी दिल्ली – अयोध्येतील भव्य दिव्य मंदिरात श्री रामलल्ला यांचा अभिषेक होण्यास आतापासून अवघा एक महिना उरला आहे. अशा परिस्थितीत योगी सरकार २२ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या भव्य कार्यक्रमाची तालीम करणार आहे. यासाठी प्रशासनाला सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ३० डिसेंबर रोजी अयोध्येतील विमानतळ आणि रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमादरम्यान जानेवारी महिन्यात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी अयोध्येच्या सजावटीची व्यवस्था अगदी तशीच असेल. त्यामुळे ३० डिसेंबरची तयारी ही २२ जानेवारीची ग्रँड रिहर्सल मानली जात आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रिहर्सलची तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत.
३० डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येला आंतरराष्ट्रीय विमानतळ, भव्य रेल्वे स्टेशनसह हजारो कोटींचे प्रकल्प देणार आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी गुरुवारीच अयोध्येला भेट दिली होती. त्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना निर्देश दिले आहेत की ३० डिसेंबर रोजी पंतप्रधानांच्या कार्यक्रमांच्या वेळी अयोध्येला २२ जानेवारीची तयारी केली जात आहे त्याच प्रकारे सजवावे.
अयोध्येतील चार मुख्य रस्ते (रामपथ, भक्तीपथ, जन्मभूमी मार्ग आणि धर्मपथ) फुलांनी आकर्षक पद्धतीने सजवावेत, असे मुख्यमंत्री योगींच्या स्पष्ट निर्देश आहेत. यावेळी, फूटपाथ सुंदर फुलांच्या कुंड्यांनी सजवावा. तसेच पदपथ आणि रामपथाच्या मुख्य गाडी मार्गादरम्यान आकर्षक रेलिंग्ज बसवाव्यात. यामध्ये पीडब्ल्यूडी, सरकारी बांधकाम महामंडळ, विकास प्राधिकरण आणि अयोध्या महानगरपालिका यांच्यात अधिक चांगला समन्वय स्थापित केला पाहिजे. अयोध्येकडे जागतिक दर्जाचे पर्यटन शहर म्हणून पाहिले पाहिजे, अशा सूचना योगी यांनी दिल्या आहेत.





