लय भारी ! लाखोंची नोकरी सोडून पडीक जमिनीत सुरु केला व्यवसाय.. वर्षाला कमावतात 25 लाख,अनेकांना दिला रोजगार

नवी दिल्ली – डडूर गावचे रहिवासी सुशांत आणि प्रकाश उनियाल यांनी दिल्लीतील नोकरी सोडून गावात मशरूम प्लांट सुरु केला.पाहता पाहता त्यांचा व्यवसाय चांगलाच मोठा झाला. उत्तराखंडच्या टिहरी जिल्ह्यातील डडूर गावात नापीक असलेल्या जमिनीवर दोन्हही भावांनी आधुनिक पद्धतीने व्यवसाय करायला सुरुवात केली आणि त्यांच आयुष्यच बदलून गेलं.
आज त्यांच्याकडे गढवाल प्रदेशातील सर्वात मोठा मशरूमचे प्लांट आहे. डडूर गावातील सुशांत उनियाल हा दिल्लीतील एका मल्टिनॅशनल कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून काम करत होता आणि त्याचा भाऊ प्रकाश हा एका बॅंकेत कार्यरत होता.नोकरीला कंटाळून 2018 मध्ये दोघांनी गावचा रास्ता धरला आणि गावातच व्यवसाय सुरू करण्याची योजना त्यांनी आखली.
2019 मध्ये केंद्र सरकारच्या मिशन ऑफ इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हिल्स (MIDH) योजनेअंतर्गत त्यांनी 28.65 लाख रुपयांचे कर्ज घेऊन गावातच ढिंगरी मशरूमचा प्लांट लावला.यानंतर त्यांनी गावातील व परिसरातील तरुणांना जोडले. व्यवसाय चालू राहिला आणि लॉकडाऊनमध्येही त्यांनी 10 लाख रुपयांचा व्यवसाय केला. आता त्यांची उत्पादन चंबा, न्यू तेहरी, ऋषिकेश, डेहराडून आणि दिल्ली येथे देखील पाठवले जाते.
सुशांत आणि प्रकाश यांचा मशरूम प्लांट हा गढवालमधील सर्वात मोठा प्लांट आहे. येथे दर महिन्याला एक हजार किलो धिंगरी मशरूमचे उत्पादन होते. ते स्थानिक बाजारात 150-180 रुपये किलो दराने मशरूम विकतात.त्यासोबतच त्यांनी हळूहळू इतर प्रॉडक्ट देखील विकायला सुरुवात केली. व्यवसाय इतका वाढू लागला की आता दोघांना इतर ठिकाणी व्यवसायाबाबत माहिती देण्यासाठी आमंत्रित केले जाऊ लागले. सुशांत आणि प्रकाश यांचा मशरूम प्लांट 15 ते 20 तरुणांना रोजगार देत आहे. सुशांत सांगतो, त्याच्या प्लांटमध्ये 15 तरुण नियमित काम करतात. याशिवाय तो इतर पाच तरुणांना कामाच्या व्यापानुसार कामासाठी बोलावतो. हंगामात 20 हून अधिक कर्मचारीही प्लांटमध्ये काम करतात.


