Prakash Ambedkar : हा आंबेडकरी जनतेशी विश्वासघात; शिंदे – आंबेडकर युतीवर प्रकाश आंबेडकरांकडून नाराजी

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज निवडणुकांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि रिपब्लिकन सेनेचे संस्थापक-अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटासोबत युती केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र या युतीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, आनंदराज आंबेडकरांच्या निर्णयामुळे आम्हाला फक्त निराशा झाली नाही, तर हे वेदनादायक आहे अशी भावना निर्माण झाली आहे. सदर युती म्हणजे फुले-शाहू-आंबेडकर विचारांशी प्रतारणा असून आंबेडकरी जनतेशी विश्वासघात आहे. जन सुरक्षा विधेयक आणून दलित-आदिवासी-मुस्लिमांच्या चळवळी दडपणा-या सरकारशी आनंदराज कशी काय युती करू शकतात, असा सवाल या पत्रकात केला आहे.
प्रकाश आंबेडकरांनी म्हटले की, पत्रकार परिषदेत आनंदराज आंबेडकर हे भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या विशेषत: शिवसेनेच्या तसेच संविधान, फुले-शाहू-आंबेडकर विचारसरणी आणि भारतीय प्रजासत्ताकाविरुद्धच्या त्यांच्या अजेंड्यावर पांघरूण घालण्यात गुंतले होते. आनंदराज आंबेडकर यांनी निधी वळवण्याची केलेली पाठराखण ही एससी, एसटी निधी वळवण्याच्या विरोधात लढणा-या आंबेडकरी जनतेशी विश्वासघात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.





