मुंबई : अमेरिकेकडून भारतावर 50 टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लावण्याचे सूतोवाच केले जात आहे. याचा फटका भारतातील मासेमारी, चर्मोद्योग, टेस्क्टाईल, जेम्स अँड ज्वेलरी, इलेक्ट्रॉनिक्स, फार्मासिटिकल्स आणि आयटी क्षेत्रालाही येणाऱ्या काळात बसण्याचा धोका असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशातील फक्त एकाच कंपनीला फायदा मिळवून देण्याच्या धोरणामुळे देशातील उद्योग व्यवसायिक आणि कामगारांना बेरोजगार होण्याची वेळ येणार आहे, असा धोक्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिले आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेत भारतीय जनतेला सावधानतेचा इशारा दिला आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करत आहे. याचा फायदा अंबानी यांना झाला असून, त्याचा तोटा सामान्य भारतीयांना होणार आहे, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. ते म्हणाले, रशियाकडून तेल खरेदी सुरु असल्यामुळे अमेरिकेसोबतचे भारताचे संबंध खराब झाले. अमेरिकेबरोबर संबंध खराब झाल्याने 50% टॅरिफ लावण्यात आले आहे. भारताचा अमेरिकेसोबत मोठा व्यापार हा टेक्स्टाईल, जेम्स अँड ज्वेलरी, इलेक्ट्रॉनिक्स, फार्मासिटिकल्स आणि पेट्रोलियम पदार्थांमधील आहे. भारतातील वस्त्रोद्योगातील (टेक्सटाइल्स) 50 ते 60% माल हा अमेरिकेला जात होता. नव्या टॅरिफ धोरमामुळे तो आता जाणार नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे एक कोटी 10 लाख लोकांच्या रोजगारावर परिणाम होणार आहे. तसेच जेम्स अँड ज्वेलरीची भारतातील इंडस्ट्री ट्रम्प टॅरिफमुळे कोसळणार आहे. इलेक्ट्रोनिक्समध्ये एक लाख 87 हजार, फार्मासिटिकल्स उद्योगांमध्ये एक लाख 62 हजार आणि इतरही उद्योगांमध्ये लाखांवर बेरोजगारी निर्माण होणार असल्याचे संकेत त्यांनी आकडेवारीसह दिले आहेत. मासेमारी उद्योग धोक्यात येणार मासेमारीच्या उद्योगावर अमेरिकेच्या टॅरिफमुळे मोठा परिणाम होणार आहे. भारतातील एकूण मासे निर्यातीपैकी 92 टक्के हिस्सा अमेरिकेला जातो. वाढलेल्या टॅरिफमुळे आता मासेमारी उद्योग संकटात सापडणार आहे. चर्मोद्योगातील 50 टक्के हिस्सा अमेरिकेला जातो. भारतातील अशा विविध उद्योगांचा डेटा गोळा केला तर या सर्व उद्योगांमधील चार ते साडेचार कोटी भारतीयांच्या रोजगारावर कुऱ्हाड कोसळणार आहे, असे ते म्हणाले.