Prakash Abitkar : सहकार दरबार मधून सहकारला पाठबळ मिळेल; सहकारमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला विश्वास

कोल्हापूर : जिल्हयातील सहकारी संस्था व सहकार तत्त्वावर चालणाऱ्या चळवळींना अधिक सक्षम, स्वयंपूर्ण, प्रभावी, समृद्ध करण्यासाठी सहकार दरबार मधून पाठबळ देण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. त्यांच्या संकल्पनेतून शासनाच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त राज्यातील पहिल्या सहकार दरबारचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयत करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
सहकार अनुषंगिक १७३ तक्रार अर्ज, यात ऑनलाइन ११० तर प्रत्यक्ष ६३ तक्रार अर्ज दाखल झाले. या कार्यक्रमाच्या उद्घाटन समयी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, लोकांच्या अडचणी, त्यांच्या सूचना, त्यांनी सांगितलेल्या उणिवा याबाबत विचार करून भविष्यात अधिक चांगल्या प्रकारे सेवा द्या. दाखल अर्जाचे वेळेत आणि प्राधान्याने निरसन करा. आपण पुन्हा आलेल्या तक्रारींवरील उत्तरांसह त्यांच्याकडे जावू. धोरणात्मक विषय असतील तर राज्य शासनाकडे मांडू. भारतासारख्या कृषिप्रधान देशात सहकार चळवळीची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते.
शेतकरी, कारागीर, लघुउद्योजक, महिला बचतगट, सहकारी बँका, दूध संघ यांसारख्या विविध घटकांना संघटित करून आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक प्रगती घडवून आणण्याचे सामर्थ्य या चळवळीत आहे. या चळवळीला प्रभावी बनवण्यासाठी आणि तिचा विकास समृद्ध दिशेने व्हावा, यासाठी सहकार दरबार एक महत्त्वपूर्ण माध्यम ठरेल. येत्या काळात राज्यस्तरावरही अशाच पद्धतीचा उपक्रम हाती घेतला जाईल असेही ते यावेळी म्हणाले.
लोकांना येणाऱ्या अडचणी वेळेत सुटल्यानंतर सहकारी संस्था अधिक सशक्त, पारदर्शक आणि कार्यक्षम बनतील, सभासदांचा सहभाग वाढेल व विश्वास निर्माण होईल असे आबिटकर म्हणाले. नवीन सहकारी संस्था स्थापन होण्यास चालना मिळेल. ग्रामीण व शेती आधारित अर्थव्यवस्थेला सामूहिक विकासाची दिशा मिळेल. सहकार चळवळ ही केवळ आर्थिक प्रगतीचे साधन नसून ती सामूहिक नेतृत्व, लोकशाही मूल्ये आणि समाजघटकांच्या एकात्मतेचे प्रतीक आहे. अशा चळवळीला सहकार दरबारासारख्या उपक्रमांमधून मिळणारे पाठबळ हे तिचे बळ आहे, असे त्यांनी सांगितले.





