खासदार प्रज्वल रेवण्णा भारतात येताच विमानतळावरच अटक करणार

बेंगळुरू – खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्या कथित लैंगिक घोटाळ्याच्या प्रकरणात सीबीआय त्यांच्याविरुद्ध ‘ब्लू कॉर्नर नोटीस’ जारी करण्याची शक्यता आहे अशी माहिती एसआयटीने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना दिली आहे. सिद्धरामय्या यांनी एसआयटी अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली, ज्या दरम्यान त्यांनी प्रज्वल रेवण्णा यांना अटक करण्यासाठी तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले.
त्यावेळी एसआयटीच्या अधिकाऱ्याने सीबीआयकडून मिळालेली माहिती त्यांना सादर केली. प्रज्वल रेवण्णा हे भारतात परत आले तर त्यांना विमानतळावरच अटक केली जाईल, अशी माहितीही एसआयटीच्यावतीने देण्यात आली आहे.
सीबीआयकडून इंटरपोलला जी ब्ल्यु कॉर्नर नोटीस जारी केली जाईल त्यानुसार रेवण्णा यांचा ठावठिकाणा तपास यत्रंणांना मिळू शकेल. मात्र रेड कॉर्नर नोटीस जारी केली तरच इंटरपोल त्यांना अटक करून भारतात पाठवू शकेल. पण केंद्राने अजून तरी तशी नोटीस जारी केलेली नाही.
33 वर्षीय प्रज्वल रेवण्णा हे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू आहेत आणि त्यांचे तब्बल सुमारे तीन हजार सेक्स व्हिडीओ प्रसारीत झाले आहेत. त्यांनी शेकडो महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.





