Prajwal Revanna – कर्नाटकमधील माजी खासदार आणि माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा याला बलात्कार प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. या प्रकरणात विशेष न्यायालय उद्या (2 ऑगस्ट) शिक्षा ठोठावणार आहे. हा निर्णय ऐकल्यानंतर प्रज्वल रेवन्नाला रडू कोसळले. हा निर्णय बंगळुरु येथील लोकप्रतिनिधींशी संबंधित प्रकरणांवर सुनावणी करणाऱ्या विशेष न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणात पीडितेने कोर्टात सादर केलेली साडी महत्त्वाचा पुरावा ठरली आहे. विशेष तपास पथकाने या गुन्ह्यात 123 पुरावे सादर केले होते. बलात्कार प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर प्रज्वल रेवन्ना भावूक झाला आणि भर कोर्टात अश्रू ढाळू लागला. कोर्टातून बाहेर पडतानाही तो रडत होता. एफआयआर दाखल झाल्यानंतर 14 महिन्यात या खटल्यात निकाल देण्यात आला आहे. या प्रकरणातील खटला १८ जुलै रोजी संपला आणि ३० जुलै रोजी न्यायालयाने आदेश राखून ठेवण्यात आला होता. प्रज्वल रेवन्नाच्या विरोधातील बलात्काराच्या खटल्यात पीडितेने एक महत्त्वपूर्ण पुरावा सादर केला. पीडितेने कोर्टात एक पुरावा म्हणून एक साडी सादर केली. माजी खासदार प्रज्वल रेवन्ना याच्यावर घरातील सहाय्यक महिलेवर दोन वेळा बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडितेने या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता आणि तिच्याजवळ घटनेच्या दिवशीची साडी देखील होती. तिच साडी पीडितेने पुरावा म्हणून कोर्टात सादर केली. तपासात त्या साडीवर स्पर्मचे अवशेष सापडले. यामुळे बलात्काराच्या आरोपांना अधिक बळकटी मिळाली. दरम्यान, प्रज्वल रेवण्णा (३४) हे माजी पंतप्रधान आणि जनता दल (सेक्युलर)चे नेते एच. डी. देवेगौडा यांचे नातू आहेत. २६ एप्रिल २०२४ रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रज्वल रेवण्णाशी संबंधित अश्लील व्हिडिओ असलेले पेन ड्राइव्ह प्रसारित झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. महिला अधिकाऱ्याने केला तपास या प्रकरणाचा तपास सीआयडीच्या तपास अधिकारी शोभा आणि त्यांच्या पथकाने केला. 31 डिसेंबर 2024 रोजी या खटल्याची सुनावणी सुरु झाली. कोर्टामध्ये 23 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. याशिवाय कोर्टात व्हिडिओ क्लिप आणि फॉरेन्सिक रिपोर्ट, घटनास्थळाचा पंचनामा सादर करण्यात आला. सात महिन्यांमध्ये खटल्याची सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेण्यात आला, त्यानंतर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश संतोष गजानन भट्ट यांनी बलात्कार प्रकरणी प्रज्वल रेवन्नाला दोषी ठरवले.