Prajakta Mali : प्राजक्ता माळीने घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत दिले ‘हे’ निवेदन

मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. तिने सागर बंगल्यावर जाऊन फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान तिने फडणवीसांना निवेदनही दिलं. यावेळी प्राजक्ता माळीसोबत तिचे कुटुंबीयदेखील उपस्थित होते. आमदार सुरेश धस यांनी माफी न मागितल्यामुळे तिने ही भेट घेतली आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आश्वासन
प्राजक्ता माळी यांच्या सन्मानाला बाधा येईल, असं कुठलंही कृत्य खपवून घेणार नाही, त्यावर कारवाई केली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्राजक्ता माळीला दिलं आहे. युट्युबवर काही लोक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करतात, अशी तक्रारही प्राजक्ता माळीने मुख्यमंत्र्यांकडे केली, त्यावरसुद्धा कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आले आहे.
सुरेश धस यांच्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार
भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर टीका करताना अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव घेतलं, यानंतर प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेऊन सुरेश धस यांना प्रत्युत्तर दिलं. तसंच सुरेश धस यांनी माफी मागावी, अशी मागणी प्राजक्ता माळीकडून करण्यात आली. मात्र सुरेश धस यांनी माफी मागण्यास नकार दिला. यानंतर प्राजक्ता माळीने महिला आयोगाकडे सुरेश धस यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. आता महिला आयोग यावर काय निर्णय घेतो हे पाहणे महत्वाचे असणार आहे.





