Prajakta Mali : 13 वर्षांनंतर ‘प्राजक्ता माळी-ललित प्रभाकर’ पुन्हा एकत्र; ‘शुभ मंगलम जोडी दंगलम’ची घोषणा
प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर यांची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर पाहायला मिळणार असल्याची बातमी समोर येताच त्यांच्या चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

Prajakta Mali | Lalit Prabhakar : मराठी मनोरंजनविश्वात काही ऑनस्क्रीन जोड्या अशा असतात, ज्या मालिका संपल्यानंतरही प्रेक्षकांच्या मनात कायम राहतात. त्यांच्या व्यक्तिरेखा, त्यांच्यातील केमिस्ट्री आणि पडद्यावरचा गोडवा प्रेक्षकांच्या मनात इतका घर करून जातो की, अनेक वर्षांनंतरही त्या जोडीला पुन्हा एकदा एकत्र पाहण्याची इच्छा कायम असते.
अशाच लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अभिनेता ललित प्रभाकर. ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेत आदित्य आणि मेघना या व्यक्तिरेखा साकारत या जोडीने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य केलं होतं. आता याच लोकप्रिय जोडीने तब्बल 13 वर्षांनंतर पुन्हा एकत्र येण्याची घोषणा करत चाहत्यांना मोठं सरप्राइज दिलं आहे.
प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर यांची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर पाहायला मिळणार असल्याची बातमी समोर येताच त्यांच्या चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. विशेष म्हणजे, ही जोडी एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या सिनेमाचं नावही तितकंच भन्नाट आहे. ‘शुभ मंगलम जोडी दंगलम’ असं या चित्रपटाचं नाव असून चित्रपटाची घोषणा सोशल मीडियावर एका खास व्हिडीओद्वारे करण्यात आली आहे.
‘आणि आम्ही परत एकत्र आलो…’; प्राजक्ताची खास पोस्ट
प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर या चित्रपटाचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. या व्हिडीओमध्ये प्राजक्ता आणि ललितची भेट ज्या पद्धतीने दाखवण्यात आली आहे, ती पाहिल्यानंतर ‘जुळून येती रेशीमगाठी’ची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे जुन्या मालिकेतील त्यांच्या लोकप्रिय केमिस्ट्रीची झलक पुन्हा पाहायला मिळणार असल्याने चाहत्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.
“आणि आम्ही परत एकत्र आलो.. गेली 13 वर्षे हा महाराष्ट्र आमच्यावर भरभरून प्रेम करतोय. आपली ही रेशीमगाठ अजून घट्ट करायला आणि तुम्हाला परत प्रेमात पाडायला ही जोडी परत येतेय,” असं कॅप्शन देत प्राजक्ताने हा व्हिडीओ शेअर केला आहे. यासोबतच तिने ‘The OG Jodi is back’ अशी खास टॅगलाइनही दिली आहे.
‘आदित्य-मेघना’ची केमिस्ट्री पुन्हा पाहायला मिळणार?
‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतील आदित्य आणि मेघनाची जोडी प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरली होती. मालिकेतील त्यांची प्रेमकहाणी, नात्यातील चढ-उतार आणि दोघांमधील केमिस्ट्री यामुळे प्राजक्ता आणि ललितला घराघरात ओळख मिळाली. त्यामुळे आता इतक्या वर्षांनंतर ही जोडी नव्या भूमिकांमध्ये कशी दिसणार, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
विशेष म्हणजे, नव्या चित्रपटाच्या घोषणेच्या व्हिडीओमध्येही दोघांची पहिली भेट जुन्या मालिकेतील त्यांच्या भेटीची आठवण करून देणारी आहे. त्यामुळे हा चित्रपट केवळ एका नव्या कथेची सुरुवात आहे की, जुन्या लोकप्रिय जोडीच्या आठवणींनाही यामध्ये खास जागा मिळणार आहे, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.





