प्राजक्ता कोळीची मराठी चित्रपटात एन्ट्री; ‘क्रांतिज्योती विद्यालय- मराठी माध्यम’मध्ये साकारणार भूमिका

Prajakta Koli | दिग्दर्शक हेमंत ढोमे याने काही दिवसांपूर्वी ‘क्रांतिज्योती विद्यालय- मराठी माध्यम’ या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाचे शूटिंग आलिबागमध्ये झाले असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
मात्र या चित्रपटात कोणकोणते कलाकार पाहायला मिळणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व मांडणाऱ्या या चित्रपटात दमदार स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.
‘क्रांतिज्योती विद्यालय- मराठी माध्यम’च्या कलाकारांमध्ये नेटफ्लिक्स-बॉलिवूड चित्रपट गाजवणाऱ्या एका अभिनेत्रीचाही समावेश आहे. ही अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता कोळी… युट्यूबर, अभिनेत्री, लेखिका आणि इन्फ्लूएन्सर असणाऱ्या प्राजक्ताचा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. याआधी तिने विविध हिंदी वेब सीरिज, चित्रपट आणि युट्यूब व्हिडिओंच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता तिची मराठी चित्रपटात एन्ट्री झाली आहे.
View this post on Instagram
प्राजक्ताने या सिनेमाचे पोस्टर तिच्या इन्स्टाग्रामवरही शेअर केले. तिने लिहिले की, ‘त्या भाषेच्या प्रेमाखातर, जी माझी मातृभाषा आहे. भेटूया लवकरच! चित्रीकरण संपूर्ण!!! आता मराठी शाळा पुन्हा भरणार.’ प्राजक्ताच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान ‘क्रांतिज्योती विद्यालय- मराठी माध्यम’ या सिनेमात प्राजक्तासह सचिन खेडेकर, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, अमेय वाघ, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर हे कलाकार झळकणार आहेत. हेमंत ढोमे याने लेखन-दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटाची निर्मिती त्याची पत्नी क्षिती जोग हिने केले आहे. मराठी शाळांची कमी होत जाणारी संख्या, मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व यावर मनोरंजन करत भाष्य करणारा हा चित्रपट आहे.
प्राजक्ताने याआधी २०२० मध्ये आलेली शॉर्ट फिल्स ‘खयाली पुलाव’ मधून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. नेटफ्लिक्सच्या ‘मिसमॅच्ड’ या सीरिजमधील तिच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले. २०२२ मध्ये चित्रपट ‘जुग जुग जिओ’ मध्ये तिने काम केले असून आता ती पहिल्यांदाच मराठी सिनेमात पदार्पण करणार आहे.
हेही वाचा:





