जसजशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत, तसतशी महायुती आणि मित्रपक्षांमधील अंतर्गत बेबनाव समोर येत आहे. कोकणातील काही ठिकाणी वाद उफाळले असून, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतींची शक्यता आहे, तर काही ठिकाणी महायुतीतील अस्वस्थता स्पष्ट दिसत आहे. रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील तणाव अद्याप निवळलेला नाही. पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक नेते एकमेकांवर उट्टे काढण्याची भाषा करत आहेत. उदय सामंत यांचा इशारा, प्रफुल्ल पटेल यांचे प्रत्युत्तर शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी मित्रपक्षांना खणखणीत इशारा देताना म्हटले आहे, “महायुती म्हणून आपल्याला एकत्र निवडणूक लढवायची आहे. पण कोणाला खुमखुमी असेल, तर शिवसेनेचा धनुष्यबाण कसा चालतो, हे देखील दाखवू.” या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सौम्य प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, “स्थानिक पातळीवरील अशी वक्तव्ये गांभीर्याने घेण्याची गरज नाही. स्थानिक स्तरावर आपले वर्चस्व दाखवण्यासाठी अशी वक्तव्ये करावी लागतात. त्यामुळे त्याला जास्त गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही.” ठाकरे बंधूंना शुभेच्छा, महाविकास आघाडीवर टिप्पणी महाविकास आघाडीत राज ठाकरे यांच्या संभाव्य प्रवेशाबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे, “महाविकास आघाडी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांपुरतीच आहे. ठाकरे बंधूंची युती पक्की आहे. ज्यांना सोबत यायचे आहे, त्यांचे स्वागत आहे.” यावर प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, “ठाकरे बंधू एकत्र येणार असतील, तर त्यांना शुभेच्छा. पण महाविकास आघाडी कितीही एकत्र आली, तरी त्याचा काही फरक पडणार नाही. विधानसभा निवडणुकीत त्यांचा पूर्णपणे सफाया झाला आहे. महाराष्ट्रातील जनता समजदार आहे आणि कोणतीही युती झाली, तरी त्याचा परिणाम होणार नाही.”