Congress coCongress MP : आसाम राज्यात निवडणुकीच्या तोंडावर मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. काँग्रेसचे खासदार प्रद्युत बोरदोलोई यांनी मंगळवारी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अवघ्या २४ तासांत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या निमंत्रणावरून बोरदोलोई यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशानंतर सरमा यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी देण्याची शिफारस पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे करणार असल्याचे संकेत दिले. दरम्यान, मुख्यमंत्री सरमा यांनी काँग्रेसवर टीका करत “आत्मसन्मान असलेला कोणीही त्या पक्षात राहू शकत नाही” असा टोला लगावला. तसेच, काँग्रेसमधील अधिकाधिक नेत्यांना भाजपमध्ये सामील करून घेण्याचा प्रयत्न सुरू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, काँग्रेसकडून या घडामोडीवर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी बोरदोलोई यांचा राजीनामा “अत्यंत दुर्दैवी” असल्याचे म्हटले. ते विशिष्ट मतदारसंघाच्या तिकिटावरून नाराज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, राजीनाम्यापूर्वी त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली नाही, असेही त्यांनी नमूद केले. राजीनाम्यामागे पक्षांतर्गत कलह, दुर्लक्ष आणि अविश्वास ही कारणे असल्याचे समोर येत आहे. स्वतः बोरदोलोई यांनीही वारंवार होणारा अपमान आणि पक्षाकडून पाठिंबा न मिळाल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे सांगितले. आसाम विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरले असताना झालेल्या या घडामोडीमुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.