‘गाण्याचा सराव कर आणि…’, आशा भोसले यांचा अमृता फडणवीसांना सल्ला

मुंबई – सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांची गाणी आजही अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलं होतं. यानिमित्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आशा भोसले यांची भेट घेतली. याचे फोटो अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या भेटीदरम्यान अमृता फडणवीस यांना आशा भोसले यांनी गाण्याचा सराव करण्याचा सल्ला ही दिल्याचे त्यांनी सांगितले.
आशा भोसले यांच्याबरोबर फोटो शेअर करताना अमृता यांनी लिहिलं की ,’मी नुकतीच आशा भोसले यांना भेटले. राज्याचा सर्वोच्च असा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचं अभिनंदनही केलं. त्यावेळी मी त्यांच्याबरोबर संगीताबाबत छान संवादही साधला. यावेळी आशाताईंनी मला गाण्याचा सराव कसा करावा आणि व्हॉईस मॉड्युलेशनबद्दल बहुमोल असं मार्गदर्शन केलं. आता मी पुढील संगीत सत्रासाठी खूप उत्सुक आहे.’
View this post on Instagram
काहीच दिवसांपुर्वी आशा भोसले यांना मुंबईमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भारतरत्न सचिन तेंडुलकर, सुधीर मुनगंटीवार, सुरेश वाडकर, जॅकी श्रॉफ, उदित नारायण उपस्थित होते.
दरम्यान, अमृता या सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. त्यांना गाण्याची प्रचंड आवड आहे. त्यांनी ‘शिव तांडव स्रोतम’, तेरी मेरी फिर से’, ‘बेटिया’, ‘कुणी म्हणाले’, ‘तेरी बन जाऊंगी’, ‘अज मैं मूड बणा लेया’ ही गाणी गायली आहेत. अनेकदा त्यांना त्यांच्या गाण्यावरून ट्रोल केले जाते.





