FDA Actions : अस्वच्छता, भेसळ, तीन खाद्य आस्थापनांवर कारवाई
FDA Actions : एफडीएचे धाडसत्र : खाद्य विक्रेत्यांमध्ये खळबळ

पिंपरी – अस्वच्छता, भेसळ आणि दूषित अन्न नागरिकांना खाऊ घालणाऱ्या खाद्य विक्रेत्यांवर एफडीए अर्थात अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईची कुऱ्हाड कोसळली आहे. एफडीएच्या धाडसत्राने शहरातील खाद्य विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
खाद्य पदार्थांच्या स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पिंपरी-चिंचवडमधील तीन खाद्य आस्थापनांवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाई केली आहे.
आयुक्तांच्या आदेशानुसार पिंपरीतील सोल्टी चायनीज, हिटलर क्रुस आणि मोशी येथील मॉमोज हाऊस या आस्थापनांवर तपासणी करून त्यांच्या अन्न व्यवसायाशी संबंधित (एफएसएसएआय) प्रमाणपत्र तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.
संबंधित आस्थापनांना सक्षम प्राधिकरणाची लेखी परवानगी मिळाल्याशिवाय खाद्य व्यवसाय सुरू न करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कडून देण्यात आले आहेत.
अन्न तयार करण्याच्या ठिकाणी अस्वच्छता
मिळालेल्या माहितीनुसार सोल्टी चायनीज आणि हिटलर क्रुस या दोन्ही आस्थापनांच्या तपासणीमध्ये गंभीर स्वच्छता आणि अन्नसुरक्षा त्रुटी आढळल्या आहेत. स्वयंपाकघर आणि संबंधित परिसरात मोठ्या प्रमाणात झुरळांचा प्रादुर्भाव असल्याचे निदर्शनास आले.
तयार अन्नाचा अयोग्य पद्धतीने साठा करणे, कच्चे आणि शिजवलेले अन्न तसेच शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ यांची योग्य प्रकारे विभागणी न करणे, त्यामुळे एका पदार्थाचा दुसऱ्या पदार्थाशी संपर्क होऊन अन्न दूषित होण्याची शक्यता निर्माण होत असल्याचे तपासणीत समोर आले.
तसेच अन्न तयार करण्याच्या परिसरातील स्वच्छता अपुरी असल्याचे आढळून आले, संबंधित परिसरात कीटक नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना अपुऱ्या होत्या.
ड्रेनेजची योग्य व्यवस्था नसणे, काही ठिकाणी पाणी साचणे आणि अन्नपदार्थांच्या साठवणुकीसाठी आवश्यक सुविधा अपुऱ्या असणे, अशा अनेक त्रुटी या तपासणीमध्ये एफडीए कडून नोंदवण्यात आल्या आहेत.
झुरळांचा प्रादुर्भाव, कृ.ित्रम खाद्य रंग
मोशी येथील स्पाईन मॉल परिसरातील मॉमोज हाऊसचीही अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली असताना, या तपासणीत आस्थापनाला ६८ पैकी ३७ गुण मिळाले असून, एकूण ५५ टक्के गुणांसह आस्थापनाला ‘नॉन-कम्प्लायंट’ असल्याचे नोंदवण्यात आले.
येथे अन्न आणि बिगर-अन्न वस्तूंचा अयोग्य साठा, शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची अपुरी विभागणी तसेच तयार खाद्यपदार्थ योग्य प्रकारे झाकून न ठेवणे यांसारख्या त्रुटी निदर्शनास आल्या.
मॉमोज हाऊसमध्येही झुरळांचा प्रादुर्भाव, स्वच्छता आणि सॅनिटेशनमधील त्रुटी आढळून आल्या. खाद्यपदार्थ हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीच्या नोंदी तसेच फूड सेफ्टी आणि फोस्टॅक प्रशिक्षणाची आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे तपासणी अहवालात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय आस्थापनात अन्नपदार्थांसाठी कृत्रिम खाद्य रंग वापरत असल्याचे ही आढळून आल्याचे नोंदही अहवालात करण्यात आले आहे. हा रंग चिकन शावरमामध्ये वापरला जात असल्याचे येथे नमूद करण्यात आले आहे.
तिन्ही आस्थापनांचे परवाने निलंबित
तपासणीदरम्यान आढळलेल्या त्रुटींची एकत्रित गंभीरता लक्षात घेऊन तिन्ही आस्थापनांवर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. संबंधित एफएसएसएआय प्रमाणपत्रे निलंबित करून खाद्य व्यवसाय तत्काळ बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित आस्थापनांना तपासणीमध्ये आढळलेल्या त्रुटी दूर करून आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच सुधारणा केल्याचा पुरावा आणि आवश्यक कागदपत्रे सक्षम प्राधिकरणाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अन्नपदार्थांच्या सुरक्षिततेशी संबंधित नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर यापुढेही अशाच प्रकारे कारवाई केली जाण्याचे सांगण्यात आले आहे.
Palghar News : पालघरच्या निवासी शाळेत विद्यार्थ्याचा तापाने मृत्यू; ३० जण रुग्णालयात दाखल





