‘ॲनिमल’ दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगाने अशाच आणखी एका अप्रतिम चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. अभिनेत्री करीना कपूर , सैफ अली खान आणि प्रभास मुख्य भूमिकेत दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्या पुढील चित्रपट ‘स्पिरिट’मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट करीना आणि सैफच्या करिअरमधील सर्वात मोठा चित्रपट ठरू शकतो, असे बोलले जात आहे. ‘स्पिरिट’मध्ये करीना मुख्य अभिनेत्री असेल आणि सैफ अली खान या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणार असल्याचेही रिपोर्ट्समध्ये नमूद करण्यात आले आहे. या चित्रपटात प्रभास मुख्य भूमिकेत म्हणजेच करिनाच्या हिरोच्या भूमिकेत दिसणार आहे. वृत्तानुसार, मीडियाशी संवाद साधताना करीनाला विचारण्यात आले की, ती पुन्हा मोठ्या पडद्यावर सैफसोबत कधी काम करणार आहे? तर यावर तिने उत्तर दिले,’आशा आहे की लवकरच’ यावरून आता सोशल मीडियावर चाहते अंदाज लावत आहे. करीना म्हणाली, ‘मला त्याच्यासोबत काम करायला आवडेल. सध्या तो पुढच्या आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या देवरा या तेलगू चित्रपटात पहिल्यांदाच काम करत आहे. याबाबत लोकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. त्यामुळे मला लवकरच त्याच्यासोबत काही काम करायला आवडेल.’ असेही तिने सांगितले होते. याआधी करीना आणि सैफने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. दोघांनी पहिल्यांदा ‘ओंकारा’ (2006) चित्रपटात एकत्र काम केले होते. यानंतर दोघांनी ‘टशन’, ‘कुर्बान’ आणि ‘एजंट विनोद’मध्येही एकत्र काम केले आहे. याशिवाय सैफ आणि करिनाने ‘रोडसाइड रोमियो’ या ॲनिमेशन फिल्ममध्ये मुख्य पात्रांसाठी आवाज दिला होता. आता संदीप रेड्डी वंगा यांच्या चित्रपटातील ही नवीन व्यक्तिरेखा पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता खूप वाढली आहे.