नेवासा : पंचगंगा उद्योग समुहाचे संस्थापक प्रभाकर शिंदे यांना कृषी सन्मान पुरस्कार जाहीर

नेवासा – पुणे येथील कृषी महाविद्यालयाचा कृषी सन्मान पुरस्कार पंचगंगा समुहाचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे. १ फेब्रुवारी रोजी कृषी महाविद्यालय पुणे येथे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
शिंदे यांना हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर नगर जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी मोठा जल्लोष व्यक्त केला. खुपटी (ता.नेवासा) या ग्रामीण भागातील खेडेगावातून सुरू झालेला त्यांचा प्रवास अतिशय खडतर आणि प्रेरणादायी ठरला आहे. सन १९९६ ला बी.एस्सी. ॲग्रीचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर त्यांनी नेवासा शहरात कृषी सेवा केंद्राचा व्यवसाय सुरू केलेला होता, त्यानंतर त्यांनी संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन येथे कांदा बियाणे प्रक्रिया हा उद्योग प्रथम छोट्या प्रमाणात सुरू केले.
या व्यवसायात त्यांना यश मिळाल्यानंतर वाळुंज औद्योगिक विकास महामंडळ येथे आठ एकर परिसरात मोठा अत्याधुनिक बियाणे प्रक्रिया उद्योग सुरू केला. आज भारतातील जवळपास १४ पेक्षा जास्त राज्यांमध्ये त्यांचे विविध प्रकारचे बियाणे वितरित केले जात आहे. एका शेतकरी कुटूंबात जन्म घेतलेल्या खेडेगावातील शेतकरी पुत्राची ही उत्तुंग भरारी राज्यालाच नव्हेतर देशातील शेतकऱ्यांसाठी एक यशोगाथा ठरलेली आहे.
देशातील कांदा बियाणे उद्योग प्रक्रियामध्ये पंचगंगाचे सिड्स उद्योग समुहाचा बहूमान देशात झळकला असून भाजीपाला आणि डाळवर्गिय पिकांमध्ये पंचगंगा बियाणांचे नाव देशात आघाडीवर आहे. दरम्यान, नेवाशाच्या भूमीपुत्राने पंचगंगा सिड्सच्या माध्यमातून देशाच्या कृषी क्षेञात घेतलेली गरुडझेप ही संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीचा एक सार्थ अभिमान असल्याचे गौरोद्गार वारकरी संप्रादयातून व्यक्त केला जात आहे.




