‘झारखंडमधील सत्ताधारी रोहिंग्यांच्या पाठीशी’ – पंतप्रधान नरेंद्र मोदी

जमशेदपूर – झारखंड राज्यातील सत्ताधारी पक्ष हा बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या पाठीशी उभे असल्याचे दिसून येत आहे. यामुळेच आज संपूर्ण झारखंड राज्य असुरक्षित वाटत असून येथील जनता भयभयीत झाली आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर टीका केली.
.
जमशेदपूर येथे आयोजीत जाहीर सभेला नरेंद्र मोदी यांनी रविवारी संबोधित केले. चंपाई सोरेन हे आदिवासी नाहीत का, असा सवाल त्यांनी यावेळी केला. त्यांचा अपमान करून मुख्यमंत्र्यांची खुर्ची ज्या प्रकारे हिसकावण्यात आली हा सर्व आदिवासींचा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले.
नरेंद्र मोदी म्हणाले, संथाल परगणामध्ये आदिवासी लोकसंख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यांच्या जमिनी बळकावल्या जात आहेत. तसेच घुसखोर पंचायतींवर कब्जा करत आहेत. मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. एकंदरीत, राज्यातील प्रत्येक झारखंड नागरिकांना असुरक्षित वाटत आहे. तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे सत्ताधारी पक्ष बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या पाठीशी उभा आहे.
झामुमो पक्षही कॉंग्रेसच्या पावलावर पाउल ठेवत आहे. या पक्षांना धर्माच्या आधारावर त्यांची व्होट बँक बनवायची आहे. पण आता हा धोका थांबवण्याची वेळ आली आहे. त्यासाठी झारखंडच्या प्रत्येक नागरिकाने संघटित होऊन भाजपला मजबूत केले पाहिजे. बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या घुसखोरीमुळे राज्यातील लोकसंख्या धोक्यात आली आहे, असेही ते म्हणाले.
सध्या झारखंडमध्ये घुसखोरी ही सर्वात मोठी समस्या आहे. या घुसखोरीची चौकशी करण्यासाठी झारखंड उच्च न्यायालयाने स्वतंत्र पॅनेल नेमण्याचे आदेश दिले होते. पण झामुमो सरकार हे मान्य करायला तयार नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला.





