पिंपरी | दरुस्तीसाठी बंद राहणार मुळशीतील वीजपुरवठा

पिंपरी, (प्रतिनिधी) – महापारेषण कंपनीच्या पिरंगुट २२०/२२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातील ५० एमव्हीए क्षमतेचा नादुरुस्त पॉवर ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे काम बुधवार (दि. ३) ते शनिवारपर्यंत (दि. ६) होणार आहे. या चार दिवसांच्या कालावधीत विजेच्या भारव्यवस्थापनासाठी महावितरणच्या काही २२ केव्ही वाहिन्यांचा वीजपुरवठा सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंद ठेवावा लागणार आहेत.
परिणामी मुळशी तालुक्यातील काही गावांमध्ये चक्राकार पद्धतीने भारनियमन करण्यात येणार आहे. सध्या तापमान चाळीस अशांच्या आसपास पोहचले असल्याने असहय होत असलेल्या उकाड्याने नागरिक त्रस्त होणार आहेत.
अनेक गावांना बसणार फटका
बुधवारी (दि. ३) महावितरणच्या २२ केव्हीच्या सहा वाहिन्यांचा वीजपुरवठा बंद राहील. त्यामुळे रिहे, भरे, घोटावडे, मुळखेड, खांबोली, कातरखडक, पिंपोली, आंधाले या गावांसह काही उच्चदाब औद्योगिक अशा सुमारे ६५०० ग्राहकांचा वीजपुरवठा सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंद राहील.
गुरूवारी (दि. ४) २२ केव्हीच्या दोन वाहिन्यांचा वीजपुरवठा बंद राहील. त्यामुळे पिरंगुट गाव, पिरंगुट औद्योगिक परिसर, पौड, दारवली, करमोळी, चाले, दखणे, खुळे, साथेसाई, नांदगाव, कोंढावळे, रावडे, शेरे, वेलावडे, जामगाव, दिसली यासह कोळवण खोऱ्यातील सर्व गावे व वाड्यावस्त्यांमधील सुमारे १८ हजार ५०० ग्राहकांचा वीजपुरवठा सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंद राहील.
शुक्रवारी (दि. ५) महावितरणच्या २२ केव्हीच्या तीन वाहिन्यांचा वीजपुरवठा बंद राहील. त्यामुळे भुगाव, भूकूम, खातपेवाडी, लवळे, चांदे, नांदे या गावांतील सुमारे २७ हजार ५०० ग्राहकांचा वीजपुरवठा सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंद राहील.
तर शनिवारी (दि. ६) उरवडे, कासारआंबोली, धोत्रेवाडी, आंबेगाव, मारणेवाडी, कोंढूर, कोंढावळे, आंधगाव, आंबरवेत, आमराळेवाडी, गडगावणे यासह मुठा खोऱ्यातील सर्व गावे व वाड्यावस्त्यांमधील सुमारे ९ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.





