पिंपरी | पक्ष्यामुळे विस्कळीत झाला वीज पुरवठा

पिंपरी, (प्रतिनिधी) – महापारेषणच्या रहाटणी १३२ केव्ही उपकेंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या अतिउच्चदाबाच्या वीजवाहिनीवर (टॉवर लाइनवर) मोठ्या पक्ष्याने इंटरनेट केबलचा तुकडा टाकल्याने शार्टसर्किट होऊन वीजपुरवठा खंडित झाला.
त्यामुळे पिंपळे सौदागर, सांगवी, वाकड, रहाटणी, काळेवाडी या परिसरात मंगळवारी (दि. २९) सकाळच्या सुमारास २० मिनिट ते दीड तासापर्यंत वीजपुरवठा विस्कळीत झाला होता, असा दावा महावितरणकडून करण्यात आला आहे.
महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, रहाटणीतील उपकेंद्राला अतिउच्चदाब वीजवाहिनीद्वारे वीज पुरवठा होतो. मात्र सकाळी आठच्या सपमारास या उपकेंद्राचा वीजपुरवठा खंडित झाला. महापारेषणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी तातडीने वीजवाहिनीची पाहणी केली. यात वाकड येथील वूडस् सोसायटीजवळ या वीजवाहिनीच्या तीनपैकी दोन वीजवाहिन्या शॉर्टसर्किटने क्षतीग्रस्त झाल्याचे दिसून आले.
त्याचखाली जमिनीवर इंटरनेटच्या केबलचे काही तुकडे जळालेले आढळून आले. पाहणी केल्यानंतर प्रथमदर्शनी एखाद्या मोठ्या पक्ष्याने इंटरनेटच्या केबलचा तुकडा घेऊन या वीजवाहिनीवर बसण्याचा प्रयत्न केला. यात केबलच्या तुकड्याचा एकाचवेळी दोन वीजवाहिन्यांना स्पर्श झाल्याने शॉर्टसर्किट झाल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याची शक्यता आहे.
दरम्यान, या उपकेंद्राला चिंचवड-गणेशखिंड अतिउच्चदाब वाहिनीद्वारे वीजपुरवठा सुरु करण्यात आला. मात्र विजेची मागणी वाढल्याने महावितरणच्या २२ केव्ही क्षमतेच्या कल्पतरू, रहाटणी, मधुबन, आकाशगंगा व पार्कस्ट्रिट या पाच वीजवाहिन्यांवर नाईलाजाने भारनियमन करावे लागले. त्यानंतर उपकेंद्रातील वीजवाहिन्यांना महापारेषणच्या चिंचवड व हिंजवडी अतिउच्चदाब उपकेंद्रातून पर्यायी वीजपुरवठा सुरु करण्यात आला.




