Pune Gramin : मलठणमध्ये वीजपुरवठा खंडित; शेतकरी दुहेरी संकटात

शिरूर : मलठण (ता. शिरूर) येथे चोरट्यांनी गणपती माळ येथील विद्युत रोहित्र फोडून तांब्याच्या तारा लंपास केल्याची घटना शनिवारी (ता. २७) उघडकीस आली. त्यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला असून, शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.
परिसरातील शेतीसाठी कृषीपंप सुरू असणे आवश्यक असताना वीजपुरवठा खंडित झाल्याने पिके आणि जनावरांचा चारा वाळण्याचा धोका निर्माण झाला आहे. चालू रब्बी हंगामात रोहित्र चोरी गेल्याने परिसरातील पिकांना जास्त प्रमाणात फटका बसणार आहे. त्यामुळे महावितरणने तातडीने नवीन रोहित्र बसवावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
‘महावितरण’ ची डोकेदुखी वाढली
बेट भागातील गावांमध्ये विद्युत रोहित्र चोरीच्या अनेक घटना घडल्या असून, आता पुन्हा चोरीच्या घटना सुरू झाल्याने शेतकऱ्यांची व महावितरणची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्रीच्या सुमारास गस्त वाढवून ग्राम सुरक्षा दल व ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मलठण (ता. शिरूर) : गणपती माळ येथे चोरट्यांनी फोडलेले विद्युत रोहित्र.





