दादा वासवानी यांच्या स्मरणार्थ टपाल तिकिटाचे प्रकाशन

पुणे – जगाला प्रेम आणि शांततेचा संदेश देणारे दादा जे. पी. वासवानी यांच्या स्मरणार्थ विशेष टपाल तिकिटाचे प्रकाशन मंगळवारी करण्यात आले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री देवुसिंह चौहान आणि आमदार शंकर लालवानी उपस्थित होते. साधू वासवानी मिशनच्या कार्यकारी प्रमुख दीदी कृष्णा कुमारी यांच्या हस्ते माननीय राज्यपाल आणि इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यानंतर दादा जे. पी. वासवानी यांच्यावरील ध्वनीचित्रफीत प्रसारित करण्यात आली. यानंतर दीदी कृष्णा कुमारी यांनी स्वागतपर भाषण केले.
यावेळी राज्यमंत्री देवुसिंह चौहान म्हणाले, “आज टपाल खात्याला दादा जे. पी. वासवानी यांच्यावरील तिकीट प्रकाशनाची संधी मिळाल्याबद्दल आनंद वाटत आहे. दादांचे बोलणे आपल्याला सांगते, की हे तंत्रज्ञान आणि प्रगतीचे युग असूनही, एक आध्यात्मिक उत्क्रांती आहे, ज्याची सर्वात जास्त गरज आहे. आपण कितीही भौतिक संपत्ती गोळा केली तरी आपण आपल्या आत्म्यानुसार कार्य करणे महत्त्वाचे आहे.’ दादा वासवानी यांच्या दोन भाषांतरित पुस्तकांचे प्रकाशनदेखील राज्यपालांनी केले.
राज्यपाल बैस म्हणाले, “दादा वासवानी हे स्वामी विवेकानंदांप्रमाणेच शांतता आणि सौहार्दाचे दूत राहिले आहेत. त्यांचे मिशन जात, पंथ किंवा वंशाचा विचार न करता सर्वांची सेवा करते. आज आपण सर्वजण त्यांच्या शिकवणीवर चिंतन करण्यासाठी एकत्र आलो आहोत. त्यांच्या मानवतावादी कार्याला सलाम करतो.’ हे टपाल तिकीट स्थानिक भारतीय टपाल कार्यालयात उपलब्ध असेल.





