जीएसटी विवरणावरील विलंब शुल्क रद्द होण्याची शक्यता

नवी दिल्ली- जीएसटी परिषदेची 40 वी बैठक अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शुक्रवारी होणार आहे. यावेळी करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.
त्याचबरोबर ऑगस्ट 2017 ते जानेवारी 2020 दरम्यान जीएसटी विवरण भरण्यास उशीर झाल्याबद्दल लागणारे विलंब शुल्क रद्द केले जाण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून व्यापारी आणि उद्योजक या संदर्भात मागणी करीत आहेत. यंत्रणेत निर्माण होणारे बिघाड आणि करोना व्हायरसमुळे अनेकांना काम वेळेवर पूर्ण करता आले नाही.
करोना व्हायरसमुळे विक्री कमी झाली आहे. त्याचा जीएसटीवर काय परिणाम होऊ शकतो. यावर विचारविनिमय केला जाणार आहे. राज्य आणि केंद्राच्या महसुलात करोना व्हायरसमुळे घट होणार आहे. यावेळी कर कपातीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता नसल्याचे अधिकाऱ्यांनी सूचित केले.





