म्युकर मायकोसिसच्या इंजेक्शनबाबत ‘सकारात्मक’ अपडेट

नवी दिल्ली – काळ्या बुरशीच्या उपचारासाठी लिपोसोमल ऍम्फोटेरिसीन बी नावाचे एक इंजेक्शन वापरले जाते. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात हे औषध मिळाल्यास ते भारतात आणावे, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यासह केंद्र सरकारने आणखी पाच कंपन्यांना लिपोसोमल ऍम्फोटेरिसीन बी तयार करण्यासाठी परवाना दिला आहे.
सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, जगातील कोणत्याही देशात हे औषध मिळत असेल तर ते त्वरित भारतात आणले जावे, अशा सूचना पंतप्रधानांनी केल्या आहेत. यामध्ये जगभरातील भारतीय दूतावासांची मदत घेतली जात आहे. भारतीय दूतावास आपापल्या देशांमध्ये लिपोसोमल ऍम्फोटेरिसीन बीची माहिती घेत आहेत.
अमेरिकेच्या गलियड सायन्सेस नावाच्या कंपनीने मदत केली आहे. ही कंपनी भारतात रेमडेसिविरदेखील पुरवित आहे. आता ही कंपनी ऍम्फोटेरिसीन बीदेखील भारताला उपलब्ध करून देत आहे.
आतापर्यंत 121,000 डोस भारतात पाठवले गेले आहेत. लवकरच 85,000 डोस भारतात येणार आहेत. कंपनीने भारतात ऍम्फोटेरिसीन बीचे 10 लाख डोस पाठवण्याचे लक्ष्य ठेवले असल्याची माहिती देण्यात आली.





