नवीन 5,138 रुग्णांची वाढ, तर 75 जणांचा मृत्यू पुणे – शहरात सलग दुसऱ्या दिवशी करोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असल्याने सकारात्मक चित्र दिसून आले. परंतु अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेले रुग्ण आणि मृत्यूंची संख्या यामुळे करोनाच्या दुसऱ्या लाटेची भयावहता अद्यापही कायम आहे. दरम्यान, शहरात गेल्या चोवीस तासांत 5 हजार 138 नवीन रुग्ण आढळले, तर तब्बल 6 हजार 802 जणांनी करोनावर मात केली आहे. दुर्दैवाने पुण्यातील 55 रुग्णांसह 75 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शहरातील ऍक्टिव्ह केसेस 52 हजार 977 पर्यंत कमी झाली आहे. यापैकी 1 हजार 277 रुग्णांवर अतिदक्षता विभागात उचपार सुरू आहेत. शहरातील आतापर्यंत रुग्णसंख्या 3 लाख 76 हजार 962 झाली असून त्यापैकी 3 लाख 17 हजार 767 जण बरेही झाले आहेत. मात्र, 6 हजार 218 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तासांत 20 हजार 204 संशयितांची करोना टेस्ट करण्यात आली आहे.