Sri Vijaya Puram: पोर्ट ब्लेअर हे नाव ब्रिटीश अधिकाऱ्याच्या नावावर का ठेवण्यात आले? आर्किबाल्ड ब्लेअर कोण होते ?

नवी दिल्ली – पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून श्री विजयपुरम करण्यात आले आहे. मोदी सरकारने पोर्ट ब्लेअरचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. पोर्ट ब्लेअरचा इतिहास काय आहे आणि या बेटाचे नाव पोर्ट ब्लेअर का ठेवण्यात आले ते जाणून घेऊया.
वास्तविक पोर्ट ब्लेअरचे नाव आर्चीबाल्ड ब्लेअर यांच्या नावावर ठेवण्यात आले होते. ते ईस्ट इंडिया कंपनीचे नौदल अधिकारी होते. त्यांनी १७८९ मध्ये चागोस द्वीपसमूह आणि अंदमान द्वीपसमूहाचे सर्वेक्षण केले. या कारणास्तव पोर्ट ब्लेअर बेटाचे नाव त्यांच्या नावावर ठेवण्यात आले.
ब्रिटिशांसाठी पोर्ट ब्लेअर हे सर्वात महत्त्वाचे बेट होते –
आर्चीबाल्ड ब्लेअर यांच्या देखरेखीखाली पोर्ट ब्लेअरला नवसंजीवनी मिळाली. हे बेट ब्रिटिश सागरी नेटवर्कचे केंद्र बनले होते. पोर्ट ब्लेअरमधूनच प्रशासकीय आणि व्यावसायिक घडामोडींवर लक्ष ठेवले जात होते.
एकेकाळी पोर्ट ब्लेअर हे शहर मासेमारीचे केंद्र होते. वसाहतवादी राजवटीत, अंदमान आणि निकोबार बेटांपासून दुर्गम भागांवर लक्ष ठेवले जात असे. पूर्व बंगालच्या उपसागरावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी ब्रिटिशांना पोर्ट ब्लेअर ताब्यात घेणे आवश्यक होते.
बेटाचा इतिहास –
पोर्ट ब्लेअरमध्येच सेल्युलर जेल आहे, जिथे ब्रिटीश राजवटीत देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांवर ब्रिटिशांनी अत्याचार केले. या कारागृहात काळ्या पाण्याची शिक्षा दिली जात होती. हे जेल पोर्ट ब्लेअर शहरातील अटलांटा पॉइंट येथे आहे. या बंदरात आशियातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी सॉ मिल आहे, ज्याला चाथम सॉ मिल म्हणतात.
नाव बदलण्यामागचा हेतू काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, ‘श्री विजयपुरम’ हे नाव आपला स्वातंत्र्यलढा आणि त्यात अंदमान निकोबारचे योगदान दर्शवते.
शुक्रवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टमध्ये शहा म्हणाले की, देशाला गुलामगिरीच्या सर्व प्रतिकांपासून मुक्त करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पाने प्रेरित होऊन गृह मंत्रालयाने पोर्ट ब्लेअरचे नाव ‘श्री विजयपुरम’ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या भारतीय बेटाला आपल्या देशाच्या स्वातंत्र्यात आणि इतिहासात अनन्यसाधारण स्थान आहे.
अमित शाह पुढे म्हणाले, “चोल साम्राज्यात नौदलाच्या तळाची भूमिका बजावणारे हे बेट आज देशाच्या सुरक्षा आणि विकासाला गती देण्यासाठी सज्ज आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस जी यांनी सर्वात आधी तिरंगा फडकावल्यापासून ते सेल्युलर जेल, हे बेट वीर सावरकर आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांच्या भारत मातेच्या स्वातंत्र्याच्या संघर्षाचे ठिकाण आहे.


