Pune : पोर्शे कार अपघात प्रकरण; रक्त नमुने बदल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल

पुणेः कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणाने संबंध राज्याला हादरवून सोडले होते. या अपघात प्रकरणात एक अपडेट आली आहे. पुणे शहरातील कल्याणीनगर भागात १८ मे २०२४ रोजी पोर्शे कारची जोराची धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार कंप्युटर इंजिनिअर आणि त्याच्या मैत्रीणीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदल्यात प्रकरणी गुन्हे शाखेने आरोपी अरुणकुमार सिंग याच्याविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. तसेच ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचा तत्कालीन प्रमुख डॅा. अजय तावरे याच्याविरोधात पुरावे, आरोपींचा जबाब आणि तांत्रिक तपासाबाबतची कागदपत्रे न्यायालयात शुक्रवारी सादर करण्यात आली.
या अपघात प्रकरणात पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक असलेल्या विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते. अपघातापूर्वी अग्रवाल यांचा मुलगा आणि त्याच्या दोन मित्रांनी मुंढवा भागातील एका पबमध्ये मद्य घेतले होते, असे पोलिसांनी केलेल्या तपासात उघडकीस आले होते. याची तपासणी करण्याकरिता त्यांना ससून रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र, त्यांच्या रक्त नमुन्यात बदल करण्यात आला होता.
रक्त नमुने बदलासाठी लाच
रक्ताचे नमुने बदल करण्यासाठी विशाल अग्रवाल त्यांची पत्नी शिवानी, अरुणकुमार सिंग यांनी अश्फाक मकानदार, अमर गायकवाड, आदित्य सूद, आशिष मित्तल यांच्यासोबत संगनमत करून ससूनमधील शिपाई अतुल घटकांबळे याच्यामार्फेत ससूमधील आत्पकालीन विभागातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॅा. श्री हरी हाळनोर आणि डॅा. तावरे यांना लाच दिली होती.
आरोपपत्र दाखल
अरुणकुमार सिंग याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने जामीन मिळवण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला होता. मात्र, त्याचा अर्ज फेटाळून लावण्यात आला आहे. त्याला दोन महिन्यांपूर्वी पोलिसांनी अटक केली होती. सिंग याच्या सांगण्यावरून कार्यालयातील कर्मचाऱ्याने मित्तल याच्या मुलाऐवजी स्वःताच्या नमुने दिले होते. यामुळे या रक्त बदल प्रकरणात दहा आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.




