Russia Ukraine war : पोप फ्रान्सिस यांच्या ‘त्या’ आवाहनाची रशियाकडून दखल

व्हॅटिकन सिटी – ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी रशिया- युक्रेन युद्ध थांबवण्याच्या हेतूने केलेल्या शांततेच्या आवाहनाची दखल घेतली गेल्याचे रशियाने म्हटले आहे. मात्र शांततेसाठी व्हॅटिकन सिटीकडून रशियापुढे कोणताही प्रस्ताव आलेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पोप यांनी केलेल्या शांततेच्या आवाहनाची दखल रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने प्रथमच उघडपणे घेण्यात आली आहे.
रशिया आणि युक्रेन दरम्यानच्या संघर्षावर तोडगा शोधण्याच्या हेतूने पोप यांनी इटलीचे कार्डिनल मॅटिओ झुप्पी यांना आपले विशेष दूत म्हणून नियुक्त केल्याचे पोप यांच्यावतीने गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आले होते. पोप यांच्या आवाहनाची आपण दखल घेतली आहे. मात्र व्हॅटिकनच्याबाजूने मॉस्कोचा कोणताही दौरा आयोजित केला गेलेला नाही. तसे कोणतेही सकारात्मक पाऊल उचलण्यात आलेले नसल्याचे रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
आपल्या प्रयत्नांचा हेतू तणाव कमी करणे हा असून तणाव कमी केल्यास शांततेचा मार्ग मोकळा होऊ शकेल, असे झुप्पी यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते.
मोझंबिकमधील यादवी युद्ध समाप्त करण्याच्या उद्देशाने रोमस्थित सॅन्टेगिदो समुदायात समेट घडवून आणण्याच्या 1990 मध्ये व्हॅटिकनने केलेल्या प्रयत्नांची त्यांनी आठवण करून दिली.




