कापूरहोळ येथील राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था; देखभालीतील विलंबामुळे अपघात, ग्रामस्थांचा संताप

सातारा – सातारा जिल्ह्यातील कापूरहोळ परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील रस्त्यांची दयनीय अवस्था आणि रिलायन्स कंपनीच्या मेंटेनन्समधील दिरंगाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. रस्त्याच्या डांबरीकरणासाठी उकरलेले रस्ते आठवडाभर उघडे पडल्याने दररोज चार ते पाच दुचाकीस्वार घसरून अपघातग्रस्त होत आहेत.
रिलायन्स कंपनीने डांबरीकरणासाठी जुना रस्ता उकरला, परंतु नव्याने डांबरीकरणाचा पत्ताच नाही. यामुळे रस्त्यावर खड्डे आणि धूळीचे साम्राज्य पसरले आहे. स्थानिक रहिवासी, सरपंच आणि प्रवाशांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त करत रस्ता दुरुस्त न झाल्यास तो बंद करण्याचा इशारा दिला आहे.
याशिवाय, कापूरहोळ येथील सार्वजनिक अंडरपासमध्ये साचलेले पाणी, दुर्गंधी आणि वारंवार बंद पडणाऱ्या लाईट्समुळे शालेय विद्यार्थी आणि नागरिकांना हाल सोसावे लागत आहेत. महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर माती साचल्यानेही अडचणी वाढल्या आहेत. ग्रामस्थांनी प्रशासनाला दोन दिवसांत उपाययोजना करण्याची मागणी केली आहे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.





