Nashik Fata – पिंपळे गुरव ते वाकड नाशिक फाटा मार्गावरील भारतरत्न रतन टाटा उड्डाणपुलाच्या सुरुवातीला उभारण्यात आलेल्या दिशा दर्शक कमानीच्या फलकांची दूरवस्था झाल्याने वाहनचालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. फलकावरील अक्षरे अस्पष्ट झाली असून दिशा दर्शविणारे बाणही खराब अवस्थेत असल्याने बाहेरगावाहून येणाऱ्या वाहनचालकांमध्ये गोंधळ निर्माण होत आहे. महत्त्वाच्या वाहतूक मार्गावर असलेल्या या कमानीवरील विविध ठिकाणांची नावे पुसट झाल्याने योग्य दिशेचा अंदाज घेणे कठीण बनले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी फलकावरील मजकूर स्पष्ट दिसत नसल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यासोबतच कमानीजवळील मेट्रो स्थानकाच्या नावामध्येही अद्याप बदल करण्यात आलेला नसल्याची बाब समोर आली आहे. “नाशिक फाटा मेट्रो स्टेशन” असा फलक अपेक्षित असताना अनेक ठिकाणी अजूनही “भोसरी मेट्रो स्टेशन” असेच नाव कायम आहे. उड्डाणपुलावर दोन ठिकाणी जुने फलक असल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, शहराच्या वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर दिशा दर्शक फलक स्पष्ट आणि अद्ययावत असणे आवश्यक आहे. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे महत्त्वाच्या मार्गावरील फलकांची अवस्था दयनीय बनली आहे. वाहतुकीच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या या परिसरातील सर्व दिशा दर्शक फलक तातडीने नव्याने बसवावेत, तसेच मेट्रो स्थानकाच्या नावातील बदल त्वरित करावेत, अशी मागणी वाहनचालक आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे. Maharashtra Weather: विदर्भासह महाराष्ट्र उष्णतेने होरपळला; अमरावतीत 46.8 अंश, अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट