पुणे | पूना हॉस्पिटलने केली अव्याहतपणे रुग्णसेवेची ४० वर्षे पूर्ण

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – रुग्णसेवा आणि लोकसेवेचा वसा अव्याहतपणे समर्थपणे पेलणाऱ्या पूना हॉस्पिटलने ४० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने काही विशेष उपक्रम जाहीर केले आहेत. यामध्ये वेगवेगळ्या वयोगटातील नागरिकांसाठी हेल्थ कार्ड, हेल्थ पॅकेजेस आणि शहरातील इतर डॉक्टरांच्या वेगवेगळ्या संघटनांसोबत संलग्नपणे रुग्णापर्यंत पोहोचण्यासाठी शहरातील विविध भागांत आरोग्य शिबिरांचे आयोजन आदींचा समावेश आहे.
याबाबतची माहिती राजस्थानी आणि गुजराथी चॅरिटेबल फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त राजकुमार चोरडिया यांनी दिली. या वेळी पूना हॉस्पिटल अँड रीसर्च सेंटरच्या नव्या बोधचिन्हाचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यासोबतच रुग्णालयात प्रदीर्घ सेवा देणाऱ्या २५ डॉक्टरांचा सन्मानही संस्थेच्या वतीने करण्यात आला. राजस्थानी आणि गुजराथी चॅरिटेबल फाउंडेशनचे अध्यक्ष देवीचंद जैन, उपाध्यक्ष दाह्याभाई शाह, सह व्यवस्थापकीय विश्वस्त पुरुषोत्तम लोहिया, विश्वस्त मंडळाचे इतर सदस्य आदी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान मुकुंददास लोहिया आणि देवीचंदजी जैन यांच्या नावाने काढण्यात आलेल्या टपाल तिकिटांचे अनावरण देखील करण्यात आले.
चोरडिया यांनी रुग्णालयातर्फे चालवल्या जाणाऱ्या विविध आरोग्य योजनांची माहिती दिली. १९८५ साली पुणे शहरातील राजस्थानी आणि गुजराथी बांधवांनी घेतलेला हा शहराच्या समाजसेवेचा वसा आम्ही असाच पुढे नेत राहू आणि शहराला अत्याधुनिक आणि रास्त दरातील आरोग्य सेवा देत राहू, असा विश्वास पुरुषोत्तम लोहिया यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात राष्ट्रीय पुरस्कार विजेते शास्त्रीत गायक राहुल देशपांडे यांचा “राहुल देशपांडे लाइव्ह’ हा सांगीतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. या वेळी राहुल यांनी सादर केलेल्या मराठी आणि हिंदी गाण्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. पुरुषोत्तम लोहिया यांनी प्रास्ताविक, तर राजेश शहा यांनी आभार मानले. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले.


