नाशिक : भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) बडतर्फ प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरच्या नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन हे प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाने घेतला आहे. कोट्यवधींची संपत्ती व महागडी वाहने असताना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र तिने मिळवल्याचा आक्षेप होता. यात तथ्य आढळल्याने विभागीय आयुक्त कार्यालयाने हे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले असल्याचा अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील बडतर्फ आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरने दिशाभूल करून नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र मिळविल्याचा गोपनीय अहवाल स्थानिक प्रशासनाने सादर केला होता. या संदर्भात नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाने पूजा खेडकरला नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र रद्द का करू नये, अशा आशयाची कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तिला तिचे म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार पूजाचे वडील दिलीप खेडकर यांनी वकिलांमार्फत म्हणणे मांडल्याचे सांगितले जाते. ही अर्धन्यायिक प्रक्रिया आहे. त्यामुळे महसूल आयुक्त कार्यालयाने कमालीची गोपनीयता बाळगली. मागील काही महिन्यांपासून यावर सुनावणी सुरू होती.