इंदापूर बाजार समितीच्या मार्केटमध्ये डाळींब ५०१ रुपये किलो

इंदापूर : इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार इंदापूर डाळींब मार्केटमध्ये, शुक्रवार (दि. ५ रोजी) डाळींब प्रति किलो रु. ५०१ या रेकॉर्डब्रेक दराने विक्री झाली, अशी माहिती बाजार समितीचे सभापती तुषार जाधव, उपसभापती मनोहर ढुके व माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी दिली.
बाजार समितीच्या राजाभाऊ गवळी फ्रुट कंपनी या आडतीवर हरिश्चंद्र साळुंखे (रा. यावली, ता. मोहोळ) या शेतकऱ्याचे डाळींब प्रति किलो रु. ९५ ते ५०१ रुपये उच्चांकी दराने खरेदी झालेली आहे. इंदापूर बाजार समितीत डाळिंब मार्केट सुरू झाल्यापासून प्रति किलोला हा पहिल्यांदाच उच्चांकी दर शेतकऱ्याला मिळाला आहे.
डाळींब मार्केटमध्ये चांगला दर मिळत असल्याने सोलापूर जिल्हा व इतर जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी इंदापूर बाजार समितीच्या मार्केटमध्ये, विश्वास पूर्व आपला शेतमाल विक्रीसाठी आणत आहेत, बाजार समितीचे योग्य नियोजन आणि संचालक मंडळाचे अधिक लक्ष असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालास मोठा दर मिळू लागला आहे.
याच समितीने मुख्य बाजार इंदापूर येथे डाळींब, पेरु व इतर फळे-भाजीपाला शेतकरी, व्यापारी खरेदीदार वर्गाकरीता लाईट, पाणी, आवक लोडींग अनलोडींग, पॅकिंगकरीता सेलहॉल, पार्किंगसाठी प्रशस्त मोकळी जागा, बंदिस्त वॉलकंपाऊंड, टॉयलेट व राहण्याची व्यवस्था केलेली आहे.
बाजार समितीने उपलब्ध केलेल्या सर्व सोयी-सुविधा, विविध योजना व उपक्रमांचा शेतकरी बांधव व व्यापारी / खरेदीदार यांनी लाभ घ्यावा असे आवाहन इंदापूर बाजार समितीचे सभापती तुषार जाधव, उपसभापती मनोहर ढुके, माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी केलेले आहे.
यावेळी संचालक माजी आमदार यशवंत माने, विलासराव माने, दत्तात्रय फडतरे, मधुकर भरणे, रोहित मोहोळकर, संग्रामसिंह निंबाळकर, संदिप पाटील, रुपालीताई संतोष वाबळे, मंगलताई गणेशकुमार झगडे, आबा देवकाते, संतोष गायकवाड, अनिल बागल, दशरथ पोळ, रोनक बोरा, सुभाष दिवसे व सचिव संतोष देवकर, रवि चव्हाण उपस्थित होते.





