दिल्लीत प्रदूषण वाढले ! सर्वसामान्यांना जगणे असह्य.. सरकारी शाळांना दिली सुट्टी

नवी दिल्ली – देशाची राजधानी दिल्लीतील हवा (Delhi Air) सतत विषारी होत आहे. लोकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीपूर्वीच हवेच्या दर्जाचा निर्देशांह (एअर क्वालिटी इंडेक्स अर्थात एक्युआय) 400 च्या पुढे गेला आहे. वाऱ्याचा वेग कमी झाल्यामुळे वायू प्रदूषणात वाढ होत आहे. प्रदूषणाबाबत दिल्ली सरकारने (Delhi Government) आज बैठक बोलावली आहे. यामध्ये ग्रॅप अर्थात ग्रेडेड रिस्पॉन्स ऍक्शन प्लानच्या तिसऱ्या टप्प्याच्या काटेकोर अंमलबजावणीबाबत चर्चा होणार आहे. (delhi Pollution )
दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय म्हणाले की, केवळ दिल्ली सरकार प्रदूषणावर पूर्णपणे नियंत्रण ठेवू शकते, असा विचार करणे सर्वप्रथम चुकीचे आहे. कारण प्रदूषणाचा मुद्दा एकट्या दिल्लीचा नाही. येथे दिल्लीच्या बाहेरील स्त्रोत दिल्लीतील स्त्रोतांपेक्षा दुप्पट प्रदूषण पसरवतात. त्यामुळे दिल्ली सरकार युद्धपातळीवर काम करत आहे. 1 नोव्हेंबरनंतर 10-15 दिवसात हवामान बदलते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यावर आम्ही अधिक भर देऊ.
शाळांना सुट्टीचा प्रस्ताव
वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने (Delhi sarkar) दोन दिवस शाळा बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून ही माहिती दिली. दिल्लीत प्रदूषणाची पातळी वाढल्याचे अरविंद केजरीवाल यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सर्व सरकारी आणि खासगी शाळा पुढील दोन दिवस बंद राहणार आहेत.
दिल्लीतील हवेचा दर्जा निर्देशांक 400 च्या पुढे
ग्रॅपचा तिसरा टप्पा देखील अंमलात आला आहे, ज्यामुळे वायु गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांसाठी शाळा बंद करण्याचे सुचवले आहे. ही सूचना गांभीर्याने घेत दिल्ली सरकारने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संध्याकाळी उशिरा ही माहिती दिली. दिल्ली सरकारसोबतच दिल्ली महानगरपालिकेच्या सर्व प्राथमिक शाळाही दोन दिवस बंद राहणार आहेत.
गुरुवारी दिल्लीतील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत राहिली. दिल्लीशिवाय नोएडा (Noida) आणि ग्रेटर नोएडामधील हवा अत्यंत खराब श्रेणीत नोंदवली गेली. ग्रॅप-3 लागू झाल्यामुळे सर्व अत्यावश्यक बांधकाम आणि पाडकामांवर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय दिल्ली, गुरुग्राम, फरीदाबाद, गाझियाबाद आणि गौतम बुद्ध नगरमध्ये पेट्रोलवर चालणाऱ्या बीएस-3 इंजिन आणि डिझेलवर चालणाऱ्या बीएस-4 चारचाकी वाहनांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.
कोळसा आणि लाकूड वापरण्यास बंदी
दिल्लीच्या 300 किलोमीटर परिसरात प्रदूषण करणाऱ्या औद्योगिक युनिट्स आणि औष्णिक वीज प्रकल्पांवर लक्ष ठेवले जाईल आणि कारवाईही केली जाईल. हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या तंदूरमध्ये कोळसा आणि लाकूड वापरण्यावरही पूर्ण बंदी घालण्यात आली आहे.





