Rahul Gandhi : मोदींनी देशाची शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली; राहुल गांधींची टीका
प्रशासकीय गोंधळाचा धागा पकडत काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे.

Rahul Gandhi : नॅशनल टेस्टींग एजन्सीकडून घेण्यात येणाऱ्या सीयुईटी परीक्षेदरम्यान शनिवारी देशभरातील काही केंद्रांवर तांत्रिक बिघाडामुळे पेपर उशिरा सुरू झाला.
या प्रशासकीय गोंधळाचा धागा पकडत काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे.
पंतप्रधान मोदींनी देशाची संपूर्ण शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली आहे, असा थेट आरोप राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हिंदीतून एक पोस्ट शेअर करत सरकारवर निशाणा साधला. या पोस्टमध्ये त्यांनी देशातील प्रमुख राष्ट्रीय परीक्षांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
राहुल गांधी आपल्या पोस्टमध्ये म्हणाले, नीट, सीबीएसई, एसएससी आणि सीयुईटी या चार मोठ्या परीक्षा आहेत. एक कोटी विद्यार्थी त्याला बसले. पण यातील एकही परीक्षा सरकारला प्रामाणिकपणे आणि सुरक्षितपणे पार पाडता आलेली नाही.
स्वतःला विश्वगुरू म्हणवून घेणारे देशात एक परीक्षाही नीट घेऊ शकत नाहीत. मोदीजींनी देशाची शिक्षण व्यवस्था पूर्णपणे मोडीत काढली आहे. ज्या पिढीचे भविष्य तुम्ही उद्ध्वस्त करत आहात, तीच पिढी भविष्यात तुम्हाला याचा जाब विचारेल, असा इशाराही त्यांनी पंतप्रधानांना दिला.
यापूर्वी शुक्रवारीही राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सीबीएसई परीक्षांमधील त्रुटींवरून सरकारला धारेवर धरले होते. परीक्षांमधील गोंधळ आणि पेपरफुटीच्या प्रकरणांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन बाळगून आहेत, अशी टीका त्यांनी केली. पंतप्रधानांना लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी नसून, त्यांना फक्त आपले सरकार वाचवण्यामध्ये रस आहे. म्हणूनच ते शिक्षणमंत्र्यांवर कोणतीही कारवाई करत नाहीत, असा आरोप त्यांनी केला होता.
राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच नीट परीक्षेतील पेपरफुटीमुळे अडचणीत आलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. या संवादाचा एक व्हिडिओ देखील त्यांनी शेअर केला असून, परीक्षा पद्धतीतील गैरप्रकारांमुळे देशातील तरुण आणि पालकांमध्ये किती तीव्र संताप आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
दरम्यान, राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने स्पष्ट केले आहे की, शनिवारी परीक्षा आयोजित करणाऱ्या टीसीएस कंपनीच्या बाजूने तांत्रिक अडचण निर्माण झाली होती, ज्यामुळे काही केंद्रांवर सीयुईटी- युजी परीक्षा सुरू होण्यास उशीर झाला. मात्र, आता ही समस्या सोडवण्यात आली असून, बाधित केंद्रांवरील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पूर्ण वेळ दिला जाईल, जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.






