Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, मिळाले ‘हे’ पद
Mithun Chakraborty : पश्चिम बंगाल सरकारने अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची माहिती आणि सांस्कृतिक व्यवहार विभागाच्या विशेष सल्लागारपदी नियुक्ती केली. त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला.

Mithun Chakraborty : पश्चिम बंगाल सरकारने ज्येष्ठ अभिनेते आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य मिथुन चक्रवर्ती यांची माहिती आणि सांस्कृतिक व्यवहार (I&CA) विभागाच्या विशेष सल्लागारपदी नियुक्ती केली आहे. बुधवारी (७ ऑक्टोबर) यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आला. या पदासाठी चक्रवर्ती यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. या विभागाची जबाबदारी मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांच्याकडे आहे.
राज्य सरकारच्या आदेशानुसार, चक्रवर्ती विशेष सल्लागार म्हणून माहिती आणि सांस्कृतिक व्यवहार विभागाच्या कामकाजात भूमिका बजावतील. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री यांनी सप्टेंबरमध्ये बंगाली चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते उत्तम कुमार यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात चक्रवर्ती यांना ही जबाबदारी देण्याची घोषणा केली होती.
मिथुन चक्रवर्ती हे बंगालच्या राजकारण आणि सांस्कृतिक क्षेत्रातील परिचित नाव आहे. ७ मार्च २०२१ रोजी कोलकाता येथील परेड ग्राउंडवरील भाजपच्या सभेत त्यांनी पक्षात प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाच्या सुमारे एक तास आधी त्यांचा भाजप प्रवेश झाला होता.
नियुक्तीवर चक्रवर्तींची प्रतिक्रिया नाही –
मिथुन चक्रवर्ती भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार केले जाईल, अशी चर्चा झाली होती. मात्र, २०२१ ची विधानसभा निवडणूक, २०२४ ची लोकसभा निवडणूक आणि त्यानंतरच्या राज्य निवडणुकीत त्यांनी भाजपचे स्टार प्रचारक म्हणून काम केले. या निवडणुकांमध्ये भाजपने तृणमूल काँग्रेसला सत्तेतून हटवण्यात यश मिळवले.
चक्रवर्ती यांचा राजकीय प्रवास यापूर्वी तृणमूल काँग्रेससोबतही राहिला आहे. फेब्रुवारी २०१४ मध्ये ते तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर राज्यसभेचे खासदार झाले होते. मात्र, डिसेंबर २०१६ मध्ये त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. विशेष सल्लागारपदी नियुक्ती झाल्यानंतर चक्रवर्ती यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
‘कोबरा’ वक्तव्याने गाजली होती चर्चा –
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांनी त्यांच्या चित्रपटातील संवाद आणि आक्रमक वक्तव्यांमुळे बंगालच्या राजकारणात चांगलीच चर्चा निर्माण केली होती. ‘कोबरा’ या त्यांच्या वक्तव्याचीही मोठी चर्चा झाली होती. त्यानंतर त्यांनी राज्यात भाजपचे स्टार प्रचारक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली.
राजकारणाबरोबरच कला आणि सार्वजनिक जीवनातील योगदानासाठीही चक्रवर्ती यांना सन्मान मिळाला आहे. केंद्र सरकारने २०२४ मध्ये त्यांना देशातील तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरवले आहे.





