CJP Protest : मोठी बातमी ! विजेता दहिया यांची सीजेपीच्या प्रवक्ते पदावरून हकालपट्टी
राजधानी दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या तापलेल्या आंदोलनादरम्यान (CJP Protest) एका बाजूला आंदोलक पोलिसांच्या अमानुष लाठीमाराचा सामना करत असताना, दुसरीकडे पक्षाचे मुख्य प्रवक्तेच आरामात फास्ट-फूड केंद्रात बर्गर खात असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

CJP Protest : राजधानी दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या तापलेल्या आंदोलनादरम्यान (CJP Protest) एका बाजूला आंदोलक पोलिसांच्या अमानुष लाठीमाराचा सामना करत असताना, दुसरीकडे पक्षाचे मुख्य प्रवक्तेच आरामात फास्ट-फूड केंद्रात बर्गर खात असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
पक्षाच्या धोरणांशी तडजोड करत अत्यंत असंवेदनशील आणि बेजबाबदार वर्तन केल्याचा ठपका ठेवत ‘कॉकरोच जनता पार्टी’ने (CJP Protest) मंगळवारी मुख्य प्रवक्ते विजेता दहिया यांची पदावरून तडकाफडकी हकालपट्टी केली आहे.
आंदोलनात पोलिसांचा लाठीमार अन् प्रवक्त्यांची बर्गर पार्टी!
सोमवारी जंतरमंतर येथे पक्षाच्या वतीने ‘संसद मार्च’चे आयोजन (CJP Protest) करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान पोलीस आणि निदर्शकांमध्ये प्रचंड तणाव निर्माण होऊन जोरदार चकमक उडाली. पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज केला जात होता. परंतु, याच तणावपूर्ण आणि गंभीर वातावरणात पक्षाचे मुख्य प्रवक्ते विजेता दहिया हे एका फास्ट-फूड सेंटरमध्ये निवांत बर्गर खाताना कॅमेऱ्यात कैद झाले.
हा व्हीडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आणि नेटकऱ्यांसह पक्षाच्या स्वतःच्या समर्थकांनी दहिया यांच्यावर टीकेची झोड उठवली. या व्हिडिओमुळे पक्षाची चौफेर कोंडी झाली होती.
Do you know what Vijeta Dahiya was doing when the CJP protesters were being lathi-charged by the police for creating chaos?
He was eating a “Burger”.
Just look at the level of shamelessness. Every CJP leader kept misleading the protesters while staying away from the streets… pic.twitter.com/q8SKB3u2yP
— Amit Kumar Sindhi (@AMIT_GUJJU) July 20, 2026
पक्षाची आक्रमक भूमिका: “असंवेदनशील वर्तन अजिबात सहन करणार नाही!”
या वादाच्या पार्श्वभूमीवर पक्षाने आपल्या अधिकृत ‘एक्स’ (ट्विटर) हँडलवरून निवेदन जारी करत दहिया यांच्या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. निवेदनात म्हटले आहे की, “शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणारे आमचे कार्यकर्ते आणि संपूर्ण टीम पोलिसांच्या लाठीचार्जचा सामना करत असताना, पक्षाच्या मुख्य प्रवक्त्याचे असे असंवेदनशील व्हीडिओ समोर येणे अत्यंत खेदजनक आहे. हे वर्तन पूर्णपणे अस्वीकार्य असून त्यातून नैतिक जाणीवेचा अभाव दिसून येतो. ही कृती आमच्या आंदोलनाची मूल्ये आणि तत्त्वांशी विसंगत आहे.”
या शिस्तभंगाच्या कारवाई अंतर्गत दहिया यांची प्रवक्तेपदावरून उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्याकडील सर्व अधिकृत जबाबदाऱ्या तातडीने काढून घेण्यात आल्या आहेत.
“मला प्रचंड भूक लागली होती!” : दहियांचा अजब बचाव
पक्षाच्या कारवाईनंतर (CJP Protest) आणि चौफेर टीकेनंतर विजेता दहिया यांनी एक स्पष्टीकरण देणारा व्हीडिओ जारी करत स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. “मी बर्गर का खाल्ला? हा आजचा सर्वात मोठा मुद्दा बनला आहे. माणूस बर्गर का खातो? कारण त्याला भूक लागलेली असते! मलाही प्रचंड भूक लागली होती आणि काहीतरी छान खाल्ल्यावर मनाला समाधान मिळते, एवढाच तो विषय होता,” असे अजब स्पष्टीकरण त्यांनी दिले.
आपले कष्ट दुर्लक्षित केले जात असल्याचा आरोप करत ते पुढे म्हणाले, “मी आणि माझे सहकारी गेली दोन दिवस अजिबात झोपलेले नाही, हे कोणालाही दिसत नाही. आंदोलन संपल्यानंतर मी घरी जाऊन स्नान केले आणि त्यानंतरच काहीतरी खाण्यासाठी बाहेर पडलो होतो.” मात्र, पक्षाने त्यांचे हे स्पष्टीकरण पूर्णपणे फेटाळून लावत त्यांची हकालपट्टी कायम ठेवली.






