Politics News : कॉंग्रेस आणि राजदमध्ये दुराव्याचे संकेत

पाटणा : बिहारमधील विधानसभा निवडणुकीसाठी आता वर्षभराचाही कालावधी उरलेला नाही. अशात कॉंग्रेस आणि राजद या मित्रपक्षांमध्ये काहीसा दुरावा निर्माण होऊ लागल्याचे संकेत मिळत आहेत. बिहारमध्ये नुकताच कॉंग्रेसचा एक मेळावा झाला. त्यामध्ये बोलताना पक्षाचे सहप्रभारी शाहनवाझ आलम यांनी राजदला डिवचणारी भूमिका मांडली.
राजकारणात मोठा भाऊ, लहान भाऊ असे काही नसते. पुढील विधानसभा निवडणुकीसाठी विरोधकांच्या महाआघाडीचे जागावाटप ठरवताना विविध घटकांचा विचार केला जावा. लोकसभा निवडणुकीतील कामगिरीचाही विचार व्हावा, असे त्यांनी म्हटले. त्यामुळे त्यांनी महाआघाडीचे नेतृत्व करणाऱ्या राजदला घेरण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे.
बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण ४० जागा आहेत. त्यातील सर्वांधिक २३ जागा राजदने लढवल्या. मात्र, तो पक्ष केवळ ४ जागाच जिंकू शकला. तर, ९ जागा लढवणाऱ्या कॉंग्रेसने ३ जागा जिंकल्या. त्या आकडेवारीचा आधार घेऊन कॉंग्रेस आगामी निवडणुकीच्या जागावाटपावेळी नमते घेणार नसल्याचे सूचित झाले. एवढेच नव्हे तर, राजदला मोठा भाऊ मानण्याच्या मूडमध्ये तो पक्ष नसल्याचे स्पष्ट झाले.
कॉंग्रेसने मांडलेल्या भूमिकेने भुवया उंचावल्या गेल्या असतानाच राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांची एक कृती दोन्ही पक्षांत तणावाची ठिणगी पाडणारी ठरली. लालूंनी इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दर्शवला. त्या मुद्द्यावर कॉंग्रेसने घेतलेल्या हरकतीला कुठला अर्थ नाही, अशी आक्रमक शैलीतील टिप्पणीही त्यांनी केली.
बिहारमध्ये मागील विधानसभा निवडणूक २०२० यावर्षीच्या अखेरीस झाली. आता पुढील निवडणूक पुढील वर्षाच्या अखेरीस होईल. वेळापत्रकानुसार ती ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये अपेक्षित आहे.





