Politics News : भाजपला मोठा धक्का ! ‘या’ 3 नेत्यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश

इंफाळ : मणिपूरमधील भाजपच्या 3 नेत्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजपला रामराम ठोकणाऱ्या नेत्यांमध्ये २ माजी आमदारांचा समावेश आहे. त्या राजकीय घडामोडीमुळे मणिपूरमधील अशांत स्थितीवरून भाजपला घेरण्याची संधी कॉंग्रेसला मिळाली. मणिपूर राज्यात मे २०२३ मध्ये वांशिक संघर्षाची ठिणगी पडली. त्यानंतर हिंसाचाराच्या अनेक घटना प्रदीर्घ काळ घडल्या.
त्यावरून सत्ताधारी भाजपवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली. त्या राज्याचे मुख्यमंत्री एन.बिरेन सिंह यांनी चालू वर्षी फेब्रुवारीत राजीनामा दिला. त्यानंतर केंद्र सरकारने मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली. आता त्या राज्यात पुन्हा सरकार स्थापन करण्याच्या इराद्याने भाजपच्या गोटात हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. अशात ३ नेत्यांनी भाजपची साथ सोडत कॉंग्रेसचा हात हाती घेतला.
कॉंग्रेसने त्या घडामोडीचा आधार घेत भाजपवर निशाणा साधला. मणिपूरमधील पेच भाजपने अयोग्य पद्धतीने हाताळला. त्यामुळे त्या राज्यात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. त्याचाच प्रत्यय काही नेत्यांनी भाजपला रामराम ठोकण्याच्या घटनेतून आला, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसच्या गोटातून देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच मणिपूरला भेट देणार असल्याचे संकेत मिळत आहेत. अशात त्या राज्यातील काही नेत्यांच्या कॉंग्रेस प्रवेशाची भाजपला राजकीय धक्का देणारी घडामोड घडली.





