विधान परिषदेसाठी दादा – काकांची प्रतिष्ठा पणाला; कोण कुणावर पडणार भारी?

मुंबई : उद्या म्हणजेच 12 जुलै रोजी राज्यात विधानपरिषदेची निवडणूक पार पडणार आहे. सध्याचे राजकारण पाहता या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीदरम्यान बहुतांश राजकीय पक्षांनी आपले आमदार फुटू नयेत, यासाठी त्यांना हॉटेलमध्ये शिफ्ट केले आहे. आजपर्यंतचा विधानपरिषदेचा इतिहास पाहता या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात आमदार फोडले जातात. या निवडणुकीदरम्यान सगळ्यांचे लक्ष काँग्रेसकडे असणार आहे. कारण त्यांच्याकडे सध्या सर्वात जास्त एक्सट्रा मते आहेत. सध्या महाराष्ट्राचे लक्ष अजित पवार आणि शरद पवार यांच्या खेळीकडे लागले आहे.
दादा कि काका? कोण पडणार भारी
या विधानपरिषदेमध्ये काँग्रेसकडे सगळ्यात जास्त एक्सट्रा मते आहेत. यादरम्यान काँग्रेसच्या 3 आमदारांवर अजित पवारांचा डोळा असल्याचं सांगितलं जातं आहे. तर अजितदादांच्या आमदारांवर मोठ्या साहेबांनी म्हणजेच शरद पवारांनी जाळं टाकल्याचं बोलंलं जातं आहे. विधानपरिषदेत आपले दोन्ही आमदार प्रथम क्रमांकाच्या कोट्यातूनच निवडून आणण्यासाठी अजित पवार यांना पाच मतांची गरज आहे. त्यापैकी दोन अपक्ष आमदार आधीच्या अजित पवारांच्या बरोबर आहेत, तर आणखी तीन आमदार बाहेरून फोडावे लागणार आहेत. अजित दादांचे 41 आणि दोन अपक्ष असा हा आकडा 43 होतो. आणखी तीन आमदारांच्या मतांची दादा जुळवाजूळव कशी करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
तर दुसरीकडे काका (शरद पवार) यांच्या खेळीकडेदेखील सगळ्यांचे लक्ष लागले आहे. बारामती लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवार हे अजित पवारांवर भारी पडले होते, त्यामुळे अजित पवार आता कोणतीही रिस्क घेणार नाहीत. यामुळे अजित पवारांनी आपल्या आमदारांना मतदान होईपर्यंत एका हॉटेलात नजरकैद करून ठेवले आहेत.पण त्यातल्याच काही आमदारांना आगामी विधानसभा ही शरद पवारांच्या तुतारीवर लढवायची असल्याने पवार साहेब त्यांच्यावर शेकापच्या जयंत पाटलांना मतदान करायला भाग पाडू शकतात. त्यामुळे जर शरद पवार यामध्ये यशस्वी झाले तर अजित पवारांची राजकीय कारकीर्द मोठ्या प्रमाणात धोक्यात येऊ शकते. त्यामुळे आता काका – पुतण्यांच्या राजकीय खेळीकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
कोणत्या पक्षाकडून कोण आहेत उमेदवार ?
भाजप
पंकजा मुंडे
परिणय फुके
अमित बोरखे
योगेश टिळेकर
सदाभाऊ खोत
शिवसेना (एकनाथ शिंदे )
भावना गवळी
कृपाल तुमणे
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
राजेश विटेकर
शिवाजीराव गर्जे
काँग्रेस
डॉ. प्रज्ञा राजीव सातव
शेतकरी कामगार पक्ष (शरद पवारांचा पाठिंबा)
जयंत पाटील
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
मिलिंद नार्वेकर





