सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदेंची राजकारण एन्ट्री

महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळणार
मुंबई : सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांची राजकारणात एन्ट्री झाली आहे. त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाचे पद स्विकारले आहे. सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेत खुद्द आनंद शिंदे यांनी याविषयी माहिती दिली. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ व सोलापूर शहर मध्य हे मतदारसंघ राखीव आहेत. त्यामुळे आनंद शिंदे आगामी विधानसभा निवडणूक लढवणार का अशा चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, आनंद शिंदेंचा मंगळवारी इंदापूरजवळ अपघात झाला होता. ते आता सुखरुप आहेत.
आनंद शिंदे आणि त्यांचा मुलगा डॉ. उत्कर्ष शिंदे यांनी शिवसेनेतून विधानसभा निवडणूक लढवावी यासाठी शिवसेनेने जोरदार प्रयत्न केले होते. उद्धव ठाकरे यांनी शिंदे पिता-पुत्राला विधानसभेची ऑफर दिली असून आठवड्याभरापूर्वी मातोश्रीवर याबाबत बैठक झाल्याची माहिती होती. मात्र या बैठकीत आनंद शिंदे यांनी आपल्याला निवडणूक लढवण्यात रस नसल्याचे स्पष्ट केले होते.





