Yoga Day 2023 : एकाच मैदानावर रंगला राजकीय योग; पंकजा मुंडे आणि भागवत कराड आले आमने-सामने

छत्रपती संभाजीनगर :- राजकारणात नेत्याने एखादी गोष्ट केली मात्र त्याचे परिणाम अपेक्षित नसले की, तो नेता म्हणतो हा फक्त योगायोग आहे. असाच योगायोग छत्रपती संभाजीनगरमध्ये घडला आहे. विशेष म्हणजे, योगाच्याच कार्यक्रमात दोन भाजपच्या बड्या नेत्यांचा राजकीय योग घडला आहे.
भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे आणि केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्यात न जाणवणारे राजकीय शितयुद्ध असल्याचे सांगितले जाते. दोघेही मराठवाड्यातील आणि वंजारी समाजाचे नेतृत्व करणारे नेते आहेत. डॉ. भागवत कराड यांना केंद्रीय मंत्रिपद पंकजा मुंडे यांना डावलून दिल्याची चर्चा बरीच गाजली होती. पण आज जागतिक योग दिनानिमित्त दोघेही एका कार्यक्रमाला आमंत्रित होते.
विशेष म्हणजे, दोघांचेही कार्यक्रम एकाच ठिकाणी विभागीय क्रीडा संकुलात होते. कार्यक्रम एकाच ठिकाणी असले तरी दोन्ही कार्यक्रम वेगवेगळे होते. दोन स्टेज दोघांचे वेगवेगळे होते.
विभागीय क्रीडा संकुलात शासकीय कार्यक्रमाला डॉ. भागवत कराड यांना निमंत्रित होते. तर पंकजा मुंडे या संकुलाच्या मध्येच महिला बाल कल्याण समितीच्या कार्यक्रमाला आल्या होत्या. सुरुवातीला मुंडे यांचा कार्यक्रम सुरू झाला. तेवढ्यात अपेक्षित नसताना डॉ. कराड यांचे तिथे आगमन झाले. मग स्वागत स्वीकारून डॉ. कराड आपल्या कार्यक्रमाला निघून गेले.
दरम्यान, दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या कार्यक्रमाबद्दल आदल्या रात्री कळल्याचे सांगितले आणि एकमेकांना निमंत्रणही दिल्याचे स्पष्टीकरण दिले. असे असले तरी भाजपच्या कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांची गोची झाली. यामुळे योगा दिनाच्या दिवशी हा दोन कार्यक्रमाचा योगायोग नक्कीच नव्हता हे खरे.




