राजगुरूनगर : उत्तर पुणे जिल्हा भाजपचे माजी अध्यक्ष तसेच पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद बुट्टेपाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला. तब्बल बारा वर्षांनंतर त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुनरागमन केल्याने उत्तर पुणे जिल्ह्यात हा निर्णय राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला असून भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. वराळे (ता. खेड) येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, पक्षाचे सरचिटणीस सुरेश घुले, माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी महापौर योगेश बहल, पीडीसीसी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिलबाबा राक्षे, सुरेखा ठाकर, बाजीराव जाधव, माजी सभापती चांगदेव शिवेकर, अरुण चौधरी, लक्ष्मण टोपे, कैलास लिंभोरे, अजित बुट्टे पाटील, आशिष येळवंडे, युवक तालुकाध्यक्ष जयसिंग दरेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश झाल्याने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत भाजपचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बुट्टेपाटील यांच्या प्रवेशामुळे भामा खोरे व खेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद लक्षणीयरीत्या वाढल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. राजकीय प्रवास शरद बुट्टेपाटील यांनी भामा खोर्याचे प्रतिनिधित्व करत पुणे जिल्हा परिषदेत सलग तीन वेळा विजय मिळवून प्रभावी नेतृत्व सिद्ध केले आहे. एका टर्ममध्ये गट राखीव असतानाही त्यांच्या समर्थक महिलेला बिनविरोध जिल्हा परिषद सदस्य करून त्यांनी जिल्ह्यात नवा इतिहास घडवला होता. 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेवेळी त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. जिल्हा परिषदेत कृषी व पशुसंवर्धन सभापती म्हणून त्यांनी शेतकरी व पशुपालकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले; मात्र 2014 च्या सुमारास विधान परिषदेसाठी काम करूनही संधी न मिळाल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता.