पुणे | राजकीय पक्षांनीही मदत करावी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मतदार यादी शुद्धीकरणासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यासमवेत (बीएलओ) राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधीने (बीएलए) गृहभेटी, मतदार नोंदणीच्या अनुषंगाने विशेष मोहीम, ऑनलाइन मतदार नोंदणीत मतदारांना सहाय्य करणे अपेक्षित आहे. त्यासाठी पक्षांनी “बीएलए’ची नेमणूक करावी, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी कळसकर म्हणाल्या की, मतदार नोंदणीचे काम निरंतर सुरू असते. तथापि, विशेष पुनरीक्षण मोहिमेत प्राप्त होणारे सर्व अर्ज विहित कालमर्यादेत निकाली काढून अंतिम मतदार यादी पुढील निवडणुकीच्या अनुषंगाने तयार करण्याचे काम होत असते. त्यादृष्टीने आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम हाती घेतला आहे.
यावेळी विशेष पुनरीक्षकण कार्यक्रम- २०२४ ची माहिती देण्यात आली. बैठकीत मतदार यादीतील नाव असणे- नसण्याच्या अनुषंगाने समस्या, तपशीलात बदल, मतदान केंद्रात, मतदान खोलीत बदल, अशा विविध विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.
छायाचित्र यादीतील अस्पष्ट फोटो असलेल्या मतदारांकडून रंगीत फोटो घेण्याची प्रक्रिया करण्यात येते. तसेच पत्ता बदल, स्थलांतरण तसेच दावे व हरकतींच्या अनुषंगाने संबंधित मतदारांना नोटीस देऊन कार्यवाही केली जाते.
मतदारांनी शक्यतो आयोगाच्या https://voters.eci.gov.in या पोर्टलवरुन अथवा Voter Helpline वरुन मतदार नोंदणी, पत्ताबदल आदींचे अर्ज ६, अर्ज ७ तसेच ८ भरल्यास संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना त्यावर गतीने कार्यवाही करता येते.
मतदार यादीतील नाव वगळणुकीची यादी महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या https://ceoelection.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येते, असेही कळसकर यांनी यावेळी सांगितले.




