उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेवासा दौऱ्याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष

नेवासा : शिवसेनेचे प्रमुख नेते तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आगामी नेवासा तालुका दौऱ्याची घोषणा झाली आहे. संगमनेर येथील आभार दौऱ्यात शिंदे यांनी स्वतः या दौऱ्याची माहिती देत नेवासा येथील जनतेचे आभार मानण्यासाठी लवकरच येणार असल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांनी संगमनेरचे आमदार अमोल खताळ आणि नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांना व्यासपीठावर सोबत घेऊन ही घोषणा केली. या घोषणेमुळे शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमुळे दौऱ्याला विशेष महत्त्व-
नेवासा तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्या असून, सात जिल्हा परिषद गट, चौदा पंचायत समिती गण आणि नेवासा शहरातील नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या या दौऱ्याला राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली नेवासा तालुका शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन आणि मतदारांचे आभार मानण्यासाठी हा दौरा होणार असला तरी, या निवडणुकांमुळे या दौऱ्याची राजकीय रणनीती आणि खेळी याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘भगवा’ फडकविण्यासाठी रणनीती-
विधानसभा निवडणुकीत नेवासा तालुक्यातील जनतेने आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांच्यावर दाखविलेला विश्वास आणि प्रेम कायम ठेवण्यासाठी तसेच आगामी नगरपंचायत निवडणुकीत नेवासा शहरात शिवसेनेचा ‘भगवा’ झेंडा फडकविण्यासाठी पडद्यामागील राजकीय रणनीती आखली जात आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या या दौऱ्याला याच कारणांमुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, राजकीय निरीक्षकांचे याकडे बारकाईने लक्ष लागले आहे.
शिवसैनिकांमध्ये उत्साह-
शिंदे यांच्या नेवासा दौऱ्याच्या घोषणेमुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा देणारा ठरणार आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार लंघे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा तालुक्यात शिवसेनेची ताकद आणखी वाढण्याची शक्यता आहे. या दौऱ्यामुळे नेवासा तालुक्यातील राजकीय समीकरणे कशी बदलतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





